

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप–शिंदे सेनेच्या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असून ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला मोठा धक्का बसला.
शिंदे गटाने नगरसेवकांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवल्याच्या आरोपावरून संजय राऊत आणि उदय सामंत यांच्यात वाद रंगला.
महायुतीने 227 पैकी 118 जागा जिंकल्या असून भाजप 89 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
Mumbai News : मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा-शिंदे सेनेच्या युतीला मोठं यश मिळालं असून ठाकरेंच्या २५ वर्षांच्या सत्तेता युतीने धक्का दिला आहे. यानंतर आता मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरून मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या सर्व नगरसेवकांना मुंबईतील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये ठेवलं आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून शिंदेंकडून भाजपवर दबाव वाढवण्यासाठी असे केलं जात असल्याची टीका ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलीय.
या टीकेली आता शिवसेना नेते तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच त्यांनी पहिल्या स्टॅडिंग मिटींगच्या वेळी कोणाचे नगरसेवक नॉट रिचेबल होतात ते कळेल. त्याची ब्रेकींग न्युज होईल असा दावा केला आहे. मुंबई महापालिकेत २२७ जागांपैकी महायुतीने ११८ जागा जिंकल्या असून यात एकट्या भाजपच्या ८९ जापक्ष ठरला आहे. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने २९ जागा जिंकल्या आहेत.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा आणि शिंदे सेनेच्या युतीला चांगलं यश मिळालं असून सव्राधिक जागा भाजपच्या आहेत. त्यामुळे महापौर पदावर भाजपने दावा केला आहे. पण भाजपला महापौर पद सोडण्यास शिंदेंची शिवसेना तयार नाही. मुंबई महापालिकेत अडीच-अडीच वर्ष महापौर व्हावा अशी मागणी शिंदेंच्या शिवसेनेने केली आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी देखील तोफ डागताना त्यांचे नगर सेवक हे देखील शिवसैनिक असून ते भाजपला महापौर पद देण्यास तयार नाहीत. मराठीच महापौर व्हावा अशी त्यांची इच्छा आहे. यामुळेच त्यांना पंचतारांकीत हॉटेल डांबण्यात आल्याचा दावा केला होता. यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.
या दाव्यानंतर आता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पलटवार केला आहे. त्यांनी, शिंदेंच्या शिवसेनेबाबात जाणीवपूर्वक असे चित्र तयार केलं जात आहे. पण आमचे सर्व २९ नगरसेवक हे रिचेबल आहेत. तर कोणाचे नगरसेवक स्टॅडिंगनंतर नॉट रिचेबल होतील ते कळेल. आम्ही शिवसेनेचे असून आम्ही महायुती म्हणून लढलेलो आहोत. आमची शिकवण ही 2019 ला जे पूर्वीच्या शिवसेनेने केलं तशी नाही. म्हणजे निवडून यायचं एकत्र आणि बसायचं काँग्रेसच्या मांडीवर जाऊन. आम्ही वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराचे आहोत.
आताही एकनाथ शिंदे मुंबईच्या सगळ्या नगरसेवकांना भेटायला हॉटेलवर आले असून कोणाही नॉट रिचेबल नाही. त्यामुळे हे सगळ फक्त आमच्या पक्षाला आम्हाला बदनामी करायचे, पक्षाला कुठेतरी कमी लेखायचं काम करायचं, शिंदेंवर टीका करायची, हा काही लोकांचा उद्योग असल्याची टीका सामंत यांनी नाव न घेता राऊत यांच्यावर केली आहे. तसेच सामंत यांनी, शिंदेंच्या उठावानंतर महानगरपालिकेची पहिली निवडणूक असून आम्ही 29 ठिकाणी निवडून आलो आहोत. तर विधानसभेचा आमचा स्ट्राइक रेट 80 पैकी 60 होता. नगरपालिका नगरपंचायतीमध्ये आम्ही 72 ते 75 ठिकाणी अध्यक्ष म्हणून निवडून आलो आहोत.
त्यामुळे आमच्यावर टीका करणाऱ्यांनी स्वतःच्या आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. ज्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी काँग्रेस बरोबर जाण्यासाठी माननीय हिंदुरुदय सम्राट वंदनीय बाळासाहेब यांच्या विचारांची गद्दारी केली. त्याच्यामुळे आज सत्ता पण मिळाली नाही. कोणी त्यांचे नेतृत्वही स्वीकारलं नाही अशा लोकांनी शिंदे साहेबांना सल्ला देण्याची अजिबात आवश्यकता नसल्याचा टोलाही सांमत यांनी लगावला आहे.
तर ज्यावेळी मुंबईचा महापौर ठरवला जाईल त्यावेळी त्यांच्या पक्षाचेच अनेक नगरसेवक हे नॉट रिचेबल दिसतील, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. तर सध्या जे हॉटेल पॉलिटिक्स वरून भाष्य करत आहेत. ते काही आजचं नसून याआधी देखील हॉटेलमध्ये नगरसेवक, अनेक आमदार राहिले आहेत.
त्यामुळे अशा पद्धतीने महापालिकेत अडीच-अडीच वर्ष महापौर व्हावा अशी मागणी आम्ही केलेली नाही. त्याचे सर्व अधिकार आमचे नेते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना आहेत. मागायचे असेल तर शिंदे सांगतील. तर या गोष्टी तयार केल्या जात असून फक्त फसवण्यासाठी केल्या जात आहेत. सध्या त्यांच्याकडे कोणता मुद्दा नसल्याने ते आता अशा पद्धतीने बातम्या सोडत आहेत अशी खोचक टीका देखील उदय सामंत यांनी केली आहे.
1) मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीला किती जागा मिळाल्या?
महायुतीला एकूण 227 पैकी 118 जागा मिळाल्या आहेत.
2) या निवडणुकीत सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाने जिंकल्या?
भाजपने 89 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून यश मिळवले.
3) शिंदे गटाने किती जागा जिंकल्या आहेत?
एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने 29 जागा जिंकल्या आहेत.
4) संजय राऊत यांनी नेमका काय आरोप केला?
शिंदे गट भाजपवर दबाव टाकण्यासाठी नगरसेवकांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवत असल्याचा आरोप केला.
5) उदय सामंत यांनी यावर काय प्रत्युत्तर दिलं?
पहिल्या स्टँडिंग मिटिंगवेळी कोणाचे नगरसेवक ‘नॉट रिचेबल’ होतात ते समजेल, असे उदय सामंत यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.