Solapur News : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराचा धुरळा उडाला आहे. महायुती व महाविकास आघाडीने प्रचारानिमित्त मोठा जोर लावला आहे. त्यामुळे आता वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नसल्याने मोठा कलगीतुरा रंगला आहे. यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकार व पक्ष सोडून गेलेल्या शिंदे गटाच्या आमदारावर जोरदार निशाणा साधला.
सांगोल्यात शिवसेना (Shivsena) उद्धव ठाकरे यांची दीपक आबा साळूंखे यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे गट तसेच अमित शाह व महायुती सरकारच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. सांगोल्यात बोलताना त्यांनी आमची मशाल पेटली की सर्वांचं सगळं गरम होईल. आता बघा कशी मशाल पेटली आहे. तोबा गर्दी होते. लोकं वाट पाहत आहेत. त्याने जो गद्दारीचा वार केला तो केवळ शिवसेनेवर केला नाही, आपल्या आई असलेल्या महाराष्ट्राच्या कुशीवर केला, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केला.
या निमिताने या गद्दाराला सांगायचं आहे, तिथला डोंगर तू पाहिलास, पण इथल्या रायगडाचं टकमक टोक नाही पाहिलंस. ते तुला 23 तारखेला दिसणार आहे. त्या टकमक टोकावरुन हे सर्वजण तुझा कसा राजकीय कडेलोट करतील ते बघ. मग तुझी जी काय मस्ती होती… काय नव्हतं दिलं ? सर्व दिलं होतं. ते तुम्हाला समजेल अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी सोडून गेलेल्या आमदारांचा समाचार घेतला
यावेळी आमदार शहाजीबापू पाटील यांच्यासह शिंदे गटावर टीका केली. त्यासोबतच रेल्वेत कुणाची ओळख असेल तर त्यांनी मला 23 तारखेचे गुवाहाटीचं तिकीट काढून द्यावं, कारण एकाला तिकडे पाठवायचं आहे. मग त्याने तिथे झाडं मोजत बसावं, असा टोलाही त्यांनी लगावला.
या सर्व मंडळींनी गद्दारी करून त्यांनी आयुष्याची राखरांगोळी केली आहे. केवळ गद्दारांना गाड्याला आलो असून येत्या काळात त्यांचा माज उतरवायचा आहे. शिवसेनेसोबत गद्दारी करणाऱ्याना महाराष्ट्र कधीही क्षमा करत नाही, हा इतिहास आहे. अशा मंडळींचा महाराष्ट्रातील जनता कडेलोट करेल, असा इशारा उद्धव ठाकरेंनी भर सभेत दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.