

Ahilyanagar old age home attack : अहिल्यानगर-मनमाड रस्त्यावरील मातोश्री वृद्धाश्रमात आज पहाटे सुमारे सहा वाजता रक्तरंजित हल्ल्याची घटना घडली. वृद्धाश्रमातील राजू घुले याने तेथील सुरक्षारक्षकासह इतर वृद्धांवर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत सुरक्षारक्षक आणि एका वृद्धाचा मृत्यू झाला असून, सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
मृतांमध्ये महकाळेश्वर बाबुराव हेणे (वय 60) आणि दत्तात्रेय शंकर हारके (वय 85) यांचा समावेश आहे. तर गणेश छबू घोडके (वय 60), बाळासाहेब अंबादास घाडगे (वय 67), गोरख नारायण फुंदे (वय 75), साहेबराव दगडू भवर (वय 63), लिंबराज दामोदर पिस्के (वय 80) आणि संतोष ब्रिंगल (वय 60) हे जखमी झाले आहेत. यापैकी एका जखमीची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास राजू घुले याने प्रथम वृद्धाश्रमाच्या प्रवेशद्वाराजवळील सुरक्षारक्षकावर हल्ला (Attack) केला. या हल्ल्यात सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला. त्यानंतर घुले वृद्धाश्रमाच्या परिसरात गेला आणि आणखी एका व्यक्तीवर हल्ला केला. त्यातही संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला. यानंतर घुले याने वृद्धाश्रमातील इतर रहिवाशांवर हल्ला केला. या घटनेत सहा जण जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हल्ल्यानंतर काही वृद्धांनी वृद्धाश्रमाच्या समोरील पेट्रोलपंपावर जाऊन पोलिसांशी संपर्क साधल्याची माहिती आहे. त्यानंतर पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनेची सुरुवातीची माहिती मिळताना काही काळ संभ्रमाचे वातावरण होते. वृद्धाश्रमात दरोडा पडल्याची शक्यताही व्यक्त केली जात होती. मात्र, वृद्धांनी पोलिसांना घटनाक्रम सांगितल्यानंतर आणि वृद्धाश्रमातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर हल्ल्याचे चित्र स्पष्ट झाले.
घटनेची माहिती मिळताच वृद्धाश्रमाचे अध्यक्ष विक्रम राठोड आणि संचालक छाजेड यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली तसेच वृद्धाश्रमातील इतर रहिवाशांना धीर दिला. घटनेबाबत कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नयेत, असे आवाहन विक्रम राठोड यांनी केले आहे.
या हल्ल्यामागे नेमके कारण काय होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज, घटनाक्रम आणि संबंधित व्यक्तींची माहिती तपासली जात आहे. “घटना नेमक्या कोणत्या कारणातून घडली, याचा तपास सुरू आहे,” अशी माहिती पोलिस उपअधीक्षक शिरीष वमणे यांनी दिली. दरम्यान, या घटनेमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली असून, वृद्धाश्रमातील सुरक्षाव्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलिसांच्या तपासातून हल्ल्याचे नेमके कारण आणि घटनेचा संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.