Subsidy For Sugar Factories : साखर कारखान्यांसाठी 700 रुपये अनुदान द्या; बिपीन कोल्हेंचा इशारा, ‘50% कारखाने बंद पडतील’

Bipin Kolhe seeks ₹700 per tonne aid as drought threatens sugarcane yield and sugar recovery : ऊस उत्पादन आणि साखर उतारा घटण्याची शक्यता; केंद्र-राज्य सरकारने प्रत्येकी ₹350 प्रतिटन अनुदान द्यावे, अशी मागणी
Bipin Kolhe
Bipin KolheSarkarnama
Published on: 
Updated on: 

Sugar Sactories Maharashtra : यंदा सरकारच्या धोरणानुसार साखर हंगाम नेहमीपेक्षा एक महिना अगोदर सुरू होत आहे. त्यातच राज्यातील अनेक भागांत दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून, पावसाने दिलेल्या प्रदीर्घ ओढीचा परिणाम ऊस उत्पादन आणि साखर उताऱ्यावर होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे साखर उद्योगाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने 350 रुपये आणि राज्य सरकारने 350 रुपये, असे एकूण 700 रुपये प्रतिटन अनुदान साखर कारखान्यांना द्यावे, अशी मागणी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केली.

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या 64 व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नीप्रदीपन सोहळा बिपीन कोल्हे, कारखान्याचे युवा अध्यक्ष आमदार विवेक कोल्हे (Vivek Kolhe), संचालक ज्ञानदेवराव औताडे आणि बेबीताई औताडे यांच्या हस्ते झाला. यावेळी बिपीन कोल्हे यांनी साखर उद्योगासमोरील आर्थिक आणि कृषी क्षेत्रातील आव्हानांवर भाष्य केले.

बिपीन कोल्हे म्हणाले, यंदाच्या पावसाळ्याच्या सुरुवातीला चांगले पर्जन्यमान झाले. मात्र त्यानंतर सुमारे तीन महिने पावसाने ओढ दिली. त्याचा फटका खरीप हंगामासह ऊस शेतीलाही बसला आहे. शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून, गाळपासाठी येणाऱ्या उसाची अपेक्षित परिपक्व वाढ झालेली नाही. त्यामुळे यंदा साखर उतारा कमी होण्याची शक्यता आहे. याचा थेट आर्थिक फटका ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांना (Sugar Factory) बसणार आहे. हे नुकसान काही प्रमाणात भरून काढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने मिळून कारखान्यांना 700 रुपये प्रतिटन अनुदान द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

Bipin Kolhe
Soft Loan for Sugar Factories : साखर कारखान्यांना आर्थिक बूस्टर? ‘सॉफ्ट लोन’ प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या दारी

चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता

तीन महिने पावसाने ओढ दिल्यामुळे आगामी काळात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे उपलब्ध पाणीसाठा आहे, त्यांनी आतापासूनच चारा पिकांचे नियोजन करावे, असे आवाहन कोल्हे यांनी केले. चारा-कडवळ पिकाची लागवड करण्यासाठी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना आपल्या सभासद शेतकऱ्यांना मोफत चारा बियाणे उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Bipin Kolhe
Nilesh Lanke : नीला विखेंच्या विधानानंतर नीलेश लंकेंची पोस्ट; विखे पिता-पुत्रांना नाव न घेता टोला

पुढील हंगामासाठी आतापासून नियोजनाची गरज

पुढील हंगामासाठी पुरेसा आणि शाश्वत ऊस उपलब्ध व्हावा, यासाठी आतापासूनच नियोजन करणे आवश्यक आहे. कारखान्याच्या शेतकी विभागातील प्रत्येक कर्मचाऱ्याने किमान 15 गुंठ्यांचे एक हजार प्लॉट शोधून त्यावर ऊस लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे, अशी सूचना बिपीन कोल्हे यांनी केली. कारखान्याने उपाध्यक्षांसह दहा संचालकांची समिती स्थापन करून ऊस लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करावे आणि त्याचा दर पंधरा दिवसांनी आढावा घ्यावा. अशा पद्धतीने नियोजन केल्यास पुढील हंगामासाठी काही प्रमाणात शाश्वत ऊस उपलब्ध होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.

तर 50 टक्के कारखाने बंद पडतील

पुढील हंगामाचे योग्य नियोजन केले नाही, तर राज्यातील 50 टक्के साखर कारखाने बंद पडण्याचा धोका आहे, असा इशाराही बिपीन कोल्हे यांनी दिला. दुष्काळाचे संकट मोठे असून, या परिस्थितीत ऊस उत्पादक शेतकरी, सभासद आणि कामगारांनी एकजुटीने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. "एकमेकांच्या हातात हात घालून काम केले, तर येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करण्याचा आपण प्रयत्न करू," असा विश्वासही बिपीन कोल्हे यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com