Ahmednagar : संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांना विचारल्याशिवाय काही करण्याची कोणाची हिमंत नाही. अशा स्थितीत तेथे त्यांचे 'भावी मुख्यमंत्री' असे फलक लागले. त्यामुळे त्यांच्या मनातली गोष्ट लपून राहिली नाही. परंतु, त्यांचे 'भावी मुख्यमंत्री' स्वप्न भंगणार आहे, असा दावा माजी पालकमंत्री, भाजपचे आमदार राम शिंदे यांनी केला.
"तुम्ही ओरबाडून सत्ता मिळवली होती. पण, आता माणसे सांभाळताना तुमची धांदल उडाली आहे. देशात विरोधी पक्ष नेता देता येईल, एवढी देखील संख्या तुमच्या पक्षाला गाठता आलेली नाही," अशी टीका आमदार शिंदे ( Ram Shinde ) यांनी थोरात यांच्यावर केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भाजपचे सध्या 'घर चलो अभियान' सुरू असून त्या अंतर्गत शनिवारी ( 10 फेब्रुवारी ) नगर शहरातील नागरिकांच्या आमदार शिंदेंनी भेटी घेतल्या. यावेळी आमदार शिंदेंनी मोदी सरकारने केलेल्या कामांची माहिती नागरिकांना दिली. यावेळी आमदार शिंदेंनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.
"निवडणूक असल्यानं ठाकरेंची फडणवीसांवर टीका"
"देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून प्रभावी काम केले आहे. आताही उपमुख्यमंत्री व गृहमंत्री म्हणून ते कर्तव्यदक्ष काम करीत आहेत. मात्र, उद्धव ठाकरे हे फडणवीस यांच्यावर टीका करताना पातळी सोडत आहेत. ते स्वतः मनोरुग्ण झाले आहेत आणि त्यांच्या सत्तेच्या काळात ते घरकोंबडा होते. करोना काळात कोणाच्या दुःखातही सहभागी होत नव्हते. त्यांची निष्क्रियता त्याच वेळी दिसली होती. पण, आता निवडणूक असल्याने ते फडणवीस यांच्यावर टीका करीत आहेत," असं शिंदेंनी म्हटलं.
"महाराष्ट्राची तुलना बिहारशी करणे हे विरोधकांना शोभत नाही"
"विरोधकांनी केलेली राष्ट्रपतीची राजवटची मागणी गांभीर्याने घेण्याची गरज नाही. राज्यातली कायदा व सुव्यवस्था स्थिती चांगली आहे. आपसातील वादातून काही घटना घडल्या आहेत. तरी लोकांचे जीव जात असताना त्यावर राजकारण करणे, टोकाच्या टीका करणे, महाराष्ट्राची तुलना बिहारशी करणे हे विरोधकांना शोभत नाही," असेही शिंदेंनी सुनावलं आहे.
"मत मांडताना भावना दुखवणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे"
पुण्यातील 'निर्भय बनो' सभेदरम्यान झालेल्या राड्यावरून भाजप शिंदे यांनी पुणे पोलिसांना सल्ला दिलाय. "पुणे पोलिसांनी वादग्रस्त वक्तव्य करत कोणाच्याही सार्वभौमात्वावर, हक्कांवर गदा आणता कामा नये. संविधान आहे. विरोधकांवर बोलले, तरी ते संवैधानिक आणि संसदीय असले पाहिजे. बोलता येते म्हणून दुसऱ्याने टीका करणे आणि एकाने सहन करणे, असे होत नाही. मत मांडायचे अधिकार सर्वांना आहेत. पण, मत मांडताना भावना दुखवणार नाही, मर्मावर आघात होणार नाही. कोणाचे अधिकार हिसकावले जाणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे," असंही आमदार शिंदेंनी सांगितलं.
( Edited By : Akshay Sabale )
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.