नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP National President Sharad Pawar) यांच्याविषयी अपशब्द वापरणारे भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले (Tushar Bhosale)चांगलेच अडचणीत आले आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या नेत्या याबाबत तक्रार करण्यास गेल्या. यावेळी भोसले पोलिस ठाण्यात दडून बसल्याने वाचले. दरम्यान नाशिक रोड पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.
हे प्रकरण अद्यापही शांत झालेले नाही. महिला आघाडीच्या शहराध्यक्षा अनिता भामरे महिलांसह भोसले याच्या घरी गेल्या होत्या. त्यावेळी तो घरी नव्हता. त्यानंतर या महिला पोलिस ठाण्यात गेल्या. त्यांनी निवेदन दिले. त्यावेळी पोलिसांनी भोसले यांना चौकशीसाठी बोलावले होते. त्यामुळे ते पोलिस निरीक्षकांच्या दालनात बसलेले होते. महिलांनी त्यांना बाहेर येण्यास सांगितले. मात्र पोलिस निरीक्षक गणेश न्याहाळदे यांनी त्यात हस्तक्षेप केला. त्यांनी पोलिस ठाण्यात त्याच्याशी चर्चा करू नये किंवा वाद घालू नये. कायद्याचे पालन करावे असे सांगत, श्री. भोसले यांना संरक्षण दिले. त्यानंतर या महिलांनी दीड तास पोलिस ठाण्याबाहेर प्रतिक्षा केली, मात्र ते बाहेर आलेच नाही. त्यामुळे प्रतिक्षा करणाऱ्या महिला निघून गेल्या, असे सौ भामरे यांनी `सरकारनामा`ला सांगितले.
दरम्यान आज सकाळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गणेश गायधनी श्री. भोसले याच्या घरी गेले होते. याबाबत त्यांनी सांगितले की, `आम्ही घरी गेलो तेव्हा श्री. भोसलेच्या घराला बाहेरून कुलुप होते. आम्ही घराचा मागचा दरवाजा वाजवत घरातील सदस्यांना आवाज दिले. मात्र काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर काही वेळेतच तेथे साध्या वेषातील पोलिस दाखल झाल्याने त्यांनी या कार्यकर्त्यांनी निघून जाण्यास सांगितले. त्यामुळे आम्ही निघून गेलो. मात्र या प्रकरणाचा पाठपुरावा करीत राहू.` यावेळी निखिल भागवत, तुषार खांडबहाले, चेतन जाधव, विनायक कांडेकर, अक्षय कहांडळ, अक्षय अनवट, रोहित मते, प्रशांत अरिंगळे, समाधान कोठुळे, तुषार कोठुळे, मनिष हांडोरे आदींसह विविध कार्यकर्ते होते.
दरम्यान याबाबत पोलिस निरीक्षक न्याहाळदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल साळुंखे यांनी काल श्री. भोसले यांना पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. त्यानंतर त्याने सोशल मीडियावर केलेल्या विधानाबाबत त्याला समज देण्यात आली. श्री. भोसले यांनी आपले ट्वीट डिलीट केले. त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. यापुढे वाद होईल असे कोणतेही विधान केल्यास त्याबाबत कायदेशीर कारवाई होईल, अशी नोटीस त्याला बजावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.