Chhagan Bhujbal : भुजबळांना स्वतः, मुलगा अन्‌ पुतण्या सोडून दुसरे कोणीही ओबीसी दिसत नाही; अजितदादांच्या मंत्र्याने पुन्हा डागली तोफ

Manikrao Kokate Statement : राज्याच्या मंत्रिमंडळात 17 मंत्री ओबीसी आणि 16 मंत्री हे मराठा आहेत, त्यामुळे सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. कोणावरही अन्याय होणार नाही, याची दक्षता त्यांनी घेतली आहे.
Manikrao Kokate-Chhagan Bhujbal
Manikrao Kokate-Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Nashik, 23 December : माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या मनात नेमकं काय आहे, हे कोण सांगेल. भुजबळांना ओबीसी म्हणून ते स्वतः, पुतण्या आणि मुलगा एवढंच दिसत असेल आणि त्यांना दुसरा कोणी ओबीसी दिसतच नसेल तर त्याला आपण काय करू शकत नाही. कारण तो त्यांचा विचार आहे. आमच्या पक्षाने भुजबळांना भरभरून दिलं आहे, त्यामुळे त्यांच्या मंत्रिपदासाठी मी अजितदादांकडे मध्यस्थी करणार नाही, अशी रोखठोक भूमिका नवनिर्वाचित कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मांडली.

राज्याच्या मंत्रिमंडळात कृषिमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर नाशिकमध्ये माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचा जंगी सत्कार करण्यात आला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना कोकाटे यांनी पुन्हा एकदा भुजबळांवर तोफ डागली आहे. ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन छगन भुजबळ यांनी आपल्या मनातील शल्य बोलून दाखवले असेल. मुख्यमंत्र्यांनी त्यावर तोडगा काढायचा विचार करून सर्वांना बरोबर घेत राज्य चालविण्याचा विचार त्यांच्या मनात आहे.

राज्याच्या मंत्रिमंडळात 17 मंत्री ओबीसी आणि 16 मंत्री हे मराठा आहेत, त्यामुळे सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. कोणावरही अन्याय होणार नाही, याची दक्षता त्यांनी घेतली आहे, त्यामुळे त्यांच्या भूमिकेचे मी स्वागत करतो. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या संदर्भात योग्य तो निर्णय मुख्यमंत्री घेऊ शकतात. त्याबाबत आमचं कोणतंही म्हणणं नाही, असेही कोकाटे यांनी स्पष्ट केले.

कोकाटे म्हणाले, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चूक असेल तर पक्षश्रेष्ठींकडून भुजबळांची समजूत काढली जाईल. पण, पक्षाची काय चूकच नसेल तर समजूत कशासाठी काढायची. आमच्या पक्षाच्या लोकांना माहिती आहे की, कुठल्याही प्रकारची आपली चूक नाही. आमच्या पक्षाने जो न्याय छगन भुजबळ यांना दिलेला आहे, तसा न्याय अन्य कोणत्याही पक्षाने आपल्या नेत्यांना दिलेला नाही, त्यामुळे चूक झालेली आहे, असं आम्हाला वाटत नाही.

छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळावं, यासाठी मी अजित पवारांकडे कोणतीही मध्यस्थी करणार नाही, असेही माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले कृषिमंत्रिपद हे आव्हानात्मक खातं आहे. शेतकऱ्यांसाठी 24 तास काम करावं लागणारं हे खातं आहे. औषधे, बि-बियाणे, मार्केट, उत्पादन, अतिवृष्टी, दुष्काळ अशी संकटे शेतकऱ्यांसमोर असतात. त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासन पातळीवर जे जे करता येईल, ते करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे, असेही कोकाटे यांनी नमूद केले.

ते म्हणाले, कांद्यावरील निर्यातमूल्य वीस टक्क्यांच्या ऐवजी दोन-पाच टक्के करण्यासाठी आमचा केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. त्यातून बाजारभाव वाढण्यास मदत होईल. पण हा तात्पुरता उपाय आहे. त्याऐवजी कायमस्वरूपी उपाय काढण्यासाठी मी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी बोलेन आणि त्यातून मार्ग काढण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com