नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे नाव घेताच थुंकल्यामुळे खासदार संजय राऊत यांच्याविषयी शिंदे गटाकडून तीव संताप व्यक्त केला जात आहे. त्या गरम वातावरणातच खासदार राऊत हे आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. त्र्यंबकेश्वर येथे मंत्री दादा भुसे आणि खासदार राऊत हे समोरासमोर आले. मात्र, अनेक दिवसाचे सोबती असलेल्या या दोन्ही नेत्यांनी एकमेकांकडे पाहिलेसुद्धा नाही. (Dada Bhuse-Sanjay Raut came face to face in Trimbakeshwar)
खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या थुंकण्याच्या कृतीमुळे शिंदे गटातील कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. शिंदे गटाकडून ठिकठिकाणी त्यांचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच राऊत यांनी आज सबुरीने घेण्याचा सल्ला देणाऱ्या अजित पवारांनाच डिवचले. त्यामुळे राऊतांविषयी राष्ट्रवादीच्या गोटातही नाराजीची भावना आहे. दुसरीकडे शिंदे गट हल्लाबोल करत आहे.
या तापलेल्या राजकीय वातावरणात संजय राऊत हे आज निवृत्तीनाथ महाराजांच्या दर्शनासाठी त्र्यंबकेश्वरला गेले होते. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी अगोदरच नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे मंदिरात आले होते. त्यामुळे शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते मंदिराच्या परिसरात मोठ्या संख्येने होते. मंदिरातील पूजा उरकून पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) हे मंदिराच्या बाहेर पडत होते. त्याचवेळी नेमकी संजय राऊतांची एन्ट्री झाली.
दादा भुसे हे मंदिराच्या बाहेर पडत असताना खासदार संजय राऊत हे पायऱ्यांवर येऊन थांबले होते. भुसे आतून येत असल्यामुळे आणि राऊतांच्या बरोबर आलेल्या शिवसैनिकांमुळे मंदिराच्या दारात प्रचंड गर्दी झाली होती. ढकलाढकली सुरू होती. पण दोन्ही बाजूंनी संयम बाळगण्यात आला होता. हे दोन्ही नेते जेव्हा समोरासमोर आले, त्यावेळी त्यांनी एकमेकांकडे पाहिलेसुद्धा नाही.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी दादा भुसे यांच्यावर गैरव्यवहारचे आरोप केले होते. त्याला उत्तर देताना भुसे यांनी भाकरी खातो मातोश्रीची आणि चाकरी करतो सिल्व्हर ओकची’ अशी टीका केली होती. त्यामुळे दोघांमध्ये चांगलीच झुंपली होती.
संजय राऊत आणि दादा भुसे हे शिवसेनेत अनेक वर्षे एकत्र होते. अगदी जिवाभावाने शिवसेनेत नांदले. पण एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत उभी फूट पडली. त्यानंतर अनेक वर्षे एकत्र राहिलेल्या या दोन्ही गटातून सध्या विस्तवसुद्धा जात नाही. एकमेकांवर अगदी कमरेखालचे वार करण्यात येत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.