

Maharashtra Politics : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत संशयित आरोपी म्हणून राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे नाव आल्याने मुंडे यांना तर बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकेचा लाभ घेतल्याच्या प्रकरणात जिल्हा न्यायालयाने शिक्षा कायम ठेवल्यानंतर माणिकराव कोकाटे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तिसरे मंत्री नरहरी झिरवाळ आता मुंबई मंत्रालयातील त्यांच्या कक्षातील कर्मचाऱ्याच्या लाचखोरीमुळे अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.
अधिवेशनाच्या तोंडावरच मंत्री झिरवाळ यांच्या दालनातील अधिकारी लाच घेताना सापडला आहे. प्रशासकीय वर्तुळात या प्रकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. याची जबाबदारीही झिरवाळ यांनी स्वीकारली आहे. जर या लाचखोरीचे धागेदोरे माझ्यापर्यंत येत असल्याचे सिद्ध झाले, तर त्याची जबाबदारी घेण्यास मी तयार आहे. या प्रकरणाशी माझा थेट संबंध असल्याचे सिद्ध झाल्यास मी राजीनामा देईन अशी भूमिका झिरवाळ यांनी स्पष्ट केली आहे. यापूर्वी धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता झिरवाळ हेही या प्रकरणामुळे अडचणीत येण्याची शक्यता वाढली आहे.
दरम्यान मुंडे, कोकाटे व झिरवाळ या तिघांमध्ये कोकाटे व झिरवाळ हे दोघे नाशिक जिल्ह्यातील आहेत. नाशिक जिल्ह्याला दिवंगत नेते अजित पवार यांनी तीन मंत्रीपदं दिली होती. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सात आमदार आहेत. त्यापैकी छगन भुजबळ, माणिकराव कोकाटे व नरहरी झिरवाळ या तिघांना दादांनी कॅबिनेट मंत्री केलं. परंतु शासकीय सदनिका घोटाळा प्रकरणात शिक्षा कायम ठेवण्यात आल्याने कोकाटे यांना आपल्या क्रीडामंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता राष्ट्रवादीचे भुजबळ व झिरवाळ हे दोन मंत्री जिल्ह्यात आहेत. त्यातले नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दुसरे मंत्री नरहरी झिरवाळ हे त्यांच्या कक्षातील कर्मचाऱ्याच्या लाचखोरीमुळे संकटात सापडले आहेत.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरंगे याला ३५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले. लातूर मधील एका औषध दुकानदाराचा परवाना रद्द करण्यात आला होता. तो पूर्ववत करण्याच्या बदल्यात लिपिक राजेंद्र ढेरंगे यांनी संबधित दुकानदाराकडे ५० हजारांची लाच मागीतली. तडजोडीअंती ३५ हजारांची लाच स्वीकारताना एसीबीने त्याला रंगेहाथ पकडले. त्याच्यासोबत आणखी एकाला एसीबीने ताब्यात घेतलं आहे.
झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयातच हा प्रकार घडल्याने या प्रकरणावरुन विरोधकांनी झिरवाळ यांना चारीही बाजूंनी घेरलं आहे. विरोधकांनी या प्रकरणाशी अन्न व औषध प्रशासन मंत्री झिरवाळ यांचा संबंध जोडत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच लाचेची ही रक्कम झिरवाळ यांचे खासगी सचिव रामदास गाडे यांच्या सांगण्यावरून घेतल्याचे ढेरंगे यांनी पोलिसांना सांगितल्याने झिरवाळ यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या कारवाईनंतर एसीबीने नरहरी झिरवाळ यांचे कार्यालय देखील सील केले आहे.
नरहरी झिरवाळ हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून आले आहेत. यापूर्वी ते विधानसभेचे उपाध्यक्ष होते. राष्ट्रवादीचे दोन गट पडल्यानंतर झिरवाळ अजित पवार यांच्यासोबत गेले होते. अजितदादांनी त्यांना मंत्रिपदही दिले. मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाचा आदिवासी चेहरा या लाचखोरी प्रकरणामुळे आता अडचणीत आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.