

Nashik Politics : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संघटनात्मक बांधणीसाठी सातत्याने कार्यरत असलेले आणि राज्याचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांचे विश्वासू सहकारी दिलीप जगन्नाथ खैरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नाशिक ग्रामीण (दिंडोरी लोकसभा मतदारसंघ) जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी नियुक्तीचे पत्र देत ही घोषणा केली.
दिलीप खैरे हे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संघटनात्मक कामात सक्रिय असून त्यांनी पक्षाच्या विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. सध्या ते पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदावर कार्यरत होते. पक्षनिष्ठा, संघटन कौशल्य, कार्यकर्त्यांशी असलेला सततचा संवाद आणि ग्रामीण भागातील मजबूत जनसंपर्क यामुळे त्यांनी पक्ष संघटनेत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.
विशेषतः मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. येवला-लासलगावसह दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील विविध भागांमध्ये पक्षाची विचारधारा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे, कार्यकर्त्यांना एकत्रित ठेवणे आणि पक्षाच्या कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणे यामध्ये त्यांचा नेहमीच पुढाकार राहिला आहे.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा आदिवासी, ग्रामीण आणि कृषिप्रधान भाग असल्याने येथील संघटन अधिक मजबूत करण्यासाठी अनुभवी नेतृत्वाची आवश्यकता होती. दिलीप खैरे यांच्या प्रदीर्घ राजकीय अनुभवाचा आणि संघटनात्मक कार्याचा विचार करून पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे.
नियुक्तीनंतर दिलीप खैरे यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार पार्थ पवार, आमदार पंकज भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ तसेच पक्ष नेतृत्वाचे आभार मानले आहे. पक्षाने दिलेल्या विश्वासाला न्याय देत दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संघटनात्मक ताकद अधिक वाढविण्यासाठी आणि पक्षाचे ध्येय-धोरण सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दिलीप खैरे यांच्या नियुक्तीचे पक्षाच्या सर्व स्तरांवरील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भुजबळ समर्थकांनी स्वागत करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संघटनात्मक उभारणी अधिक प्रभावीपणे होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.