Jalgaon News : दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे.स्वत:खडसेंनी देखील आपण लवकरच स्वगृही परतणार असल्याचे स्पष्ट केले आहे.तरीदेखील अद्याप त्यांचा भाजपप्रवेश रखडलेलाच आहे.पण आता ते भाजपच्या रावेरच्या उमेदवार आणि सून रक्षा खडसे यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत.याचवरुन आता मंत्री गिरीश महाजनांनी टीकेची तोफ डागली आहे.
लोकसभा निवडणुकीत रावेरच्या उमेदवार रक्षा खडसे यांची लढत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे श्रीराम पाटील यांच्याशी लढत होणार आहे. रक्षा खडसे यांच्या प्रचारात आता त्यांचे सासरे आणि भाजपचे एकेकाळचे महाराष्ट्रातील वजनदार नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हेदेखील सक्रिय झाले आहेत.एकीकडे पक्षप्रवेशाला मुहूर्त मिळत नसतानाही ते प्रचारात उतरल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
एकनाथ खडसे यानी दोन दिवसांपासून भाजप कार्यालयातून प्रचाराची सूत्र हाती घेतली आहे.त्यामुळे स्थानिक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. पक्षप्रवेशाविना खडसे भाजप कार्यालयात बैठका घेत असल्याने भाजपच्या गोटात मोठी अस्वस्थता पसरली आहे. इतकंच नाही तर यावल येथील भाजपच्या प्रचार कार्यालयात ते ठाण मांडून बसले असून भाजपच्या कार्यकर्त्यांना प्रचाराबाबत सूचनाही देखील दिल्या आहेत.
एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. परंतु त्यांचा अजूनही पक्षप्रवेश झालेला नाही. पक्ष प्रवेश झालेला नसताना एकनाथ खडसे यावल येथील भाजपच्या प्रचार कार्यालयात जावून बसले. त्यांनी भाजपच्या कार्यकत्यांना प्रचाराबाबत सूचनाही केल्या. बैठकाही घेतल्या. पक्षात नसताना खडसेंच्या या बैठकांमुळे भाजपचे स्थानिक कार्यकर्ते मात्र चांगलेच गोंधळात पडले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
एकनाथ खडसे यांनी रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्या प्रचारात सक्रिय होण्यावरुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, माझी भाजप प्रवेशाबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा झाली आहे.आणि माझ्या पक्षप्रवेशाची केवळ औपचारिकताच बाकी आहे.माझ्या भाजप प्रवेश निश्चित असून त्याची तारीख लवकरच कळवणार असल्याचे भाजप नेते विनोद तावडे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे.याचवेळी त्यांनी तोपर्यंत तुम्ही कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळेच आपण लोकसभेच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारात सक्रिय झालो असल्याचे खडसे यांनी आवर्जून सांगितले.
मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी शिर्डीत मीडियाशी बोलताना एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर थेट भाष्य केले आहे. ते म्हणाले, खडसे कधी म्हणतात, मी राष्ट्रवादीचा तर कधी भाजपचा आहे. मात्र,सध्या तरी ते राष्ट्रवादीचे आमदार आहेत.त्यांनी अजूनही आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही. यामुळे एकनाथ खडसे यांनी आगोदर आमदारकीचा राजीनामा द्यावा. मग भाजपचे काम करावं असा खोचक सल्ला दिला आहे.
महाजन म्हणाले, खडसेंच्या भूमिकेमुळे लोकांमध्ये गैरसमज निर्माण होत आहे. विधानसभेला मुलगी तुतारी घेऊन उभे राहण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे खडसेंना घरात सगळेच पक्ष ठेवायचे आहेत. यावरून त्यांची भूमिका संधीसाधूपणाची असल्याचे दिसून येत असल्याची बोचरी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.