Manikrao Kokate News: नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाही. मात्र सध्या त्यावर तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत भारतीय जनता पक्षाचा लाभ होतो की काय? अशी स्थिती आहे.
नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भाजपचे गिरीश महाजन हे प्रबळ दावेदार मानले जातात. त्यांची घोषणा देखील झाली होती. मात्र महायुतीच्या घटक पक्षांनी विरोध केल्याने त्याला स्थगिती देण्यात आली होती.
नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेना शिंदे पक्षाचे दादा भुसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे माणिकराव कोकाटे हे दोघेही इच्छुक होते. याबाबत त्यांनी राजकीय संकेत देखील वेळोवेळी दिले होते. मात्र महायुतीत एकमत होत नसल्याने हा प्रश्न अधांतरी राहिला होता.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना सदनिका घोटाळ्याप्रकरणी दोन गुरुवारी न्यायालयाने दोषी ठरवले. त्यामुळे कृषिमंत्री कोकाटे यांना आता आपले मंत्रीपद सांभाळणे हे मोठे दिव्य असणार आहे. याचा लाभ अनपेक्षितरित्या भाजप नेते महाजन यांना होईल, अशी स्थिती आहे.
नाशिक जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे पाच आमदार आहेत. मात्र कोणालाही मंत्रिमंडळात संधी मिळाली नव्हती. त्याची भर पालकमंत्री पद भाजपला देऊन काढण्यात येणार होती. मात्र सर्वाधिक सहा आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीने देखील येथे आपला दावा सांगितला होता. त्यातून महायुतीचे शिवसेना शिंदे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात चांगलीच जुंपली होती.
कृषिमंत्री कोकाटे यांना न्यायालयाने दोषी ठरविल्याने या स्पर्धेत भाजपचे गिरीश महाजन यांना ते चांगलेच पत्थ्यावर पडणार आहे. आता रायगड जिल्ह्याचा विषय शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सुरू राहील. भाजप नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती होऊ शकेल, अशी राजकीय स्थिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः याबाबत आग्रही असल्याने महायुतीत भाजपचा वरचष्मा पुन्हा एकदा सिद्ध होऊ शकेल.
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.