Kopardi Case High Court Site Inspection : कोपर्डी प्रकरणात मोठी घडामोड; मृत्युदंडाच्या निर्णयाआधी हायकोर्ट घटनास्थळी जाणार

Bombay High Court judges will inspect the Kopardi crime scene on October 2 before hearing final arguments in the death sentence case : साक्षीदारांना आरोपींच्या हालचाली दिसत होत्या का? रस्त्याची दृश्यता, घटनास्थळाची रचना आणि पुराव्यांशी संबंधित ठिकाणांची 2 ऑक्टोबरला न्यायालय करणार प्रत्यक्ष पाहणी
Kopardi Case
Kopardi CaseSarkarnama
Published on: 
Updated on: 

Bombay High Court Kopardi case : अहिल्यानगरच्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींना सुनावण्यात आलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेच्या पुष्टीकरणापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती आशीष चव्हाण यांच्या खंडपीठाने 2 ऑक्टोबर 2026 रोजी कोपर्डी येथील घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय घेतला आहे. घटनास्थळाची रचना, साक्षीदारांची नेमकी ठिकाणे, रस्त्याची दृश्यता आणि आरोपींच्या हालचाली प्रत्यक्ष दिसणे शक्य होते का, याचा न्यायालय अभ्यास करणार आहे.

या प्रकरणातील दोषींच्या अपीलांवर आणि राज्य सरकारच्या मृत्युदंड पुष्टीकरण याचिकेवर सुनावणी सुरू आहे. अंतिम युक्तिवादापूर्वी घटनास्थळ आणि त्याभोवतालच्या परिस्थितीची प्रत्यक्ष माहिती घेणे आवश्यक असल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले आहे. या प्रकरणात साक्षीदारांनी आरोपींच्या हालचाली पाहिल्याचे न्यायालयासमोर (Court) सांगितले आहे. मात्र, संबंधित साक्षीदार ज्या ठिकाणी होते, तेथून घटनास्थळ आणि रस्ता प्रत्यक्ष कितपत दिसत होता, हा महत्त्वाचा प्रश्न सुनावणीदरम्यान उपस्थित झाला.

विशेषतः एका साक्षीदाराने आरोपी (Crime) दुचाकीवरून ये-जा करत असल्याचे पाहिल्याचे सांगितले आहे. हा साक्षीदार ज्या ठिकाणी बसला होता, तेथून आरोपींच्या हालचाली दिसणे शक्य होते का, याबाबत न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले. या प्रश्नांची पुरेशी स्पष्टता सुनावणीदरम्यान मिळाली नसल्याने प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Kopardi Case
Radhakrishna Vikhe Patil : त्यांना पोरं झाली नाहीत का? विखे पाटलांची लग्नावर मिश्कील टिप्पणी (Video)

सरकारी पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानुसार, पीडितेची सायकल एका ठिकाणी आढळली, तर तिचे कपडे त्याच्या विरुद्ध दिशेच्या शेतात सापडले. त्यामुळे दोन्ही ठिकाणांमधील अंतर, घटनास्थळाची भौगोलिक रचना आणि आरोपी व साक्षीदारांच्या हालचालींचे परस्पर संबंध समजून घेणे आवश्यक असल्याचे खंडपीठाने नमूद केले आहे.

Kopardi Case
Ahilyanagar Old Age Home Attack : अहिल्यानगरच्या वृद्धाश्रमात रक्तरंजित हल्ला; 2 ठार, 6 गंभीर जखमी

नवीन पुरावा गोळा करण्यासाठी पाहणी नाही

न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, ही पाहणी नवीन पुरावा गोळा करण्यासाठी नसून कनिष्ठ न्यायालयासमोर आधीच नोंदविण्यात आलेल्या पुराव्याचे योग्य मूल्यमापन करण्यासाठी केली जाणार आहे. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 310 अंतर्गत न्यायालयाला प्रकरणातील पुरावे योग्यरीत्या समजून घेण्यासाठी संबंधित ठिकाणाची पाहणी करण्याचा अधिकार आहे. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी या पाहणीला हरकत घेतलेली नाही.

2016 मधील कोपर्डी प्रकरण नेमके काय?

13 जुलै 2016 रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाने महाराष्ट्रात मोठी प्रतिक्रिया उमटली होती. विशेष न्यायालयाने नोव्हेंबर 2017 मध्ये तीन आरोपींना दोषी ठरवत मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. त्यानंतर दोषींनी या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. तसेच राज्य सरकारने मृत्युदंडाच्या शिक्षेच्या पुष्टीकरणासाठी याचिका दाखल केली. या प्रकरणातील तिसरा दोषी जितेंद्र शिंदे याचा सप्टेंबर 2023 मध्ये कारागृहात मृत्यू झाला. सध्या दोन दोषींची अपिले आणि मृत्युदंड पुष्टीकरणाचा प्रश्न उच्च न्यायालयासमोर आहे.

घटनास्थळाच्या पाहणीनंतर काय?

2 ऑक्टोबरला प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर या प्रकरणातील पुढील सुनावणी होणार आहे. पाहणीदरम्यान तपास अधिकारी उपस्थित राहणार असून, न्यायालयाने घटनास्थळाची भौगोलिक परिस्थिती आणि पुराव्यांशी संबंधित ठिकाणे प्रत्यक्ष समजून घेण्यावर भर दिला आहे. या पाहणीमुळे साक्षीदारांच्या जबाबांमध्ये नमूद केलेली ठिकाणे, त्यांच्यातील अंतर आणि आरोपींच्या हालचालींबाबतच्या दाव्यांचे न्यायालयीन मूल्यमापन अधिक स्पष्ट होऊ शकते. मात्र, पाहणीनंतर न्यायालय नेमका कोणता निष्कर्ष काढते, हे पुढील सुनावणी आणि अंतिम निर्णयानंतरच स्पष्ट होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com