

TET Paper Leak : देशात नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. नीट पेपर फुटी प्रकरणात अनेकांना अटक करण्यात आलेली आहे. मात्र, पेपरफुटीचं हे सत्र काही केल्या थांबताना दिसत नाही. कारण आता पुन्हा उद्या होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (TET) पेपर फुटल्याने खळबळ उडाली आहे. पेपर फुटल्याने उद्या होणारी परीक्षा प्रशासनाकडून रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत संपूर्ण राज्यात 28 जून 2026 रोजी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र परीक्षेच्या एक दिवस आधीच ठाण्यातील भिवंडीतून परीक्षेचा पेपर फुटला आहे. दरम्यान शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी यासंदर्भात माध्यमांशी बोलताना पेपर फोडणाऱ्यांसह या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्यांना कारवाईचा इशारा दिला.
मंत्री भुसे म्हणाले, नीट पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवर या परीक्षेची काळजी घेण्यात आली होती. तरीही अशाप्रकारे पेपर फुटने ही गंभीर बाब आहे. याची शासनाने गंभीरपणे नोंद घेतली आहे. मा. मुख्यमंत्री महोदय व उपमुख्यमंत्री महोदयांनी याची गंभीर नोंद घेतली आहे. तसेच पोलिस प्रशासनाला या पेपर फुटीचे सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या चौकशीतून जे काही समोर येईल त्या सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल. या रॅकेटमध्ये सामील असलेल्या कोणत्याही दोषीला सोडले जाणार नाही, असा इशारा मंत्री भुसेंनी दिला.
आज पहाटे भिवंडीमध्ये काही इसमांकडे TET चा पेपर उपलब्ध असल्याची माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली. पोलिसांनी तत्काळ या प्रकरणी कारवाई करत संशयितांना ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात, या संशयितांकडून मिळालेल्या प्रश्नांमध्ये आणि मूळ प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्नांमध्ये साम्य आढळले आहे. हा घडलेला प्रकार अत्यंत गंभीर असून, पोलीस प्रशासनाच्या चौकशीमध्ये ज्या काही बाबी समोर येतील त्याप्रमाणे दोषींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे भुसे यांनी स्पष्ट केले.
याप्रकरणातील टोळी विरोधात भिवंडीत कारवाई करण्यात आली असून तिघांना अटक केल्याची माहिती आहे. कोनगाव पोलिस ठाणे हद्दीत लावलेल्या सापळ्यात तिघा जणांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यातील एकजण हरियाणा राज्यातील तर दोन बिहार मधील राहणार आहेत. हे तिघे पेपर विकायला आले होते. दीड कोटी रुपयांची मागणी त्यांनी विकत घेणाऱ्यांकडून केली होती. त्यांना कुठून पेपर मिळाला याची चौकशी सुरु असल्याची चौकशी पोलिसांनी दिली.
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी कारवाई केली. कोनगाव येथील डायमंड हॉटेलमध्ये पेपरफुटी संदर्भात संशयित असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. मात्र, हे संशयित त्या ठिकाणी आढळून आले नाहीत. त्यानंतर, पोलिसांच्या पथकाने सहारा एअरपोर्ट परिसरातून तिघांना ताब्यात घेतलं.
पोलिसांच्या प्राथमिक तपासातच ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडून टीईटी परीक्षेच्या पेपरचे प्रश्न आढळून आले आहेत. पोलिसांनी हे पेपर जप्त केले आहेत. त्यानंतर, पोलिसांनी या तिन्ही आरोपींना भिवंडीत आणले असून याप्रकरणी भिवंडी कोनगाव पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.