

Mantralaya bribery case : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात लिपिक राजू ढेरिंगे याला ३५ हजारांची लाच घेताला एसीबीने रंगेहाथ पकडल्याने सध्या मंत्री झिरवाळ हे अडचणीत आले आहे. मंत्री झिरवाळांनी याप्रकरणात चौकशीत माझे नाव आल्यास मी मंत्रिपदाचा राजीनामा देईल असे स्पष्ट केले. एकीकडे या प्रकरणाचा तपास सुरु असताना दुसरीकडे मंत्रालयात लाचेसाठी सिक्रेट कोड वापरला जात असल्याचा दावा एका मेडिकल दुकानदाराने केला आहे.
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयातील लाच प्रकरणाचा स्टिंग ऑपरेशनचा एक व्हिडीओ समोर आला आहे. निर्मल शर्मा याने हा व्हिडीओ समोर आणला असून मंत्रालयातील लाचेची देवाण-घेवाण संदर्भातील बोलणी स्पष्टपणे या व्हिडीओत दिसून येत आहे. निर्मल शर्मा यांनी गुप्तरित्या हे चित्रीकरण केलं आहे. यात प्रामुख्याने अन्न आणि औषध प्रशासन खात्याच्या कार्यालयात येणाऱ्या फाईल्सवर, कागदपत्रांवर लाल -हिरव्या रंगाच्या रेषा मारल्या जात. त्यावरुन कुणाला किती पैसे द्याचे आहेत, हे त्या विशेष खुणेवरुन लिहले जायचे किंवा सांगितले जायचे अशी माहिती समोर आली असून स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून हा व्हिडिओ ज्यांनी शूट केला त्या निर्मल शर्मा यांनी तसा धक्कादायक दावा केला आहे.
मेडिकल दुकानदार निर्मल शर्मा याने माध्यमांना माहिती देताना सांगितले की, मेडिकल सस्पेन्शनच्या सुनावण्या मंत्री घेत नसून त्यांचे अधिकारी घेतात. कोणाचीही ओळख सांगितली तरी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयात पैसे हे द्यावेच लागतात असा दावा शर्मा यांनी केला आहे. निर्मल शर्मा यांनी सांगितले की, माझ्या काही चुकांमुळे माझ्या मेडिकल दुकानाचा परवाना निलंबित झाला होता. मी मान्य करतो की, माझ्या मेडिकल दुकानात काही त्रुटी होत्या. जसे की, साफसफाई नव्हती, औषधांच्या फ्रीजमध्ये पाण्याच्या बाटल्या आणि ओआरएस ठेवले होते. त्यामुळे मला मेडिकल दुकानाचा परवाना एक महिन्यासाठी निलंबित झाल्याचा आदेश आला. मी तेही मान्य करतो की ठिक आहे माझ्याकडून चुका झाल्या. परंतु परवाना निलंबित होण्याचा आदेश मला मान्य नव्हता म्हणून त्याविरोधात मी 7 तारखेला मंत्रालयात गेलो. तिकडे अपील तयार करुन ते लिपीक राजू ढेरिंगे यांना दिले. त्यांनी अपीलमध्ये संगणकात माझ्या नावाची नोंद केली व मला सुनावणीसाठी एक पेपर दिला. माझी सुनावणी 13 तारखेला असल्याचं त्यांनी सांगतिलं.
त्यानंतर मी १३ तारखेला पुन्हा मंत्रालयात गेलो. तिथे मला डॉ. रामदास गाडे भेटले. ते कॅबिनमध्ये होते, पहिला नंबर माझाच होता, मी गेलो. डॉ. रामदास गाडे यांच्यासमोर मला बसवलं गेलं. लपीक राजू ढेरिंगे हेही आमच्या बाजूलाच होते. राजू ढेरिंगे यांनी मंत्र्यांचे पीए रामदास गाडे यांना माझं प्रकरण सांगितलं. एका महिन्यासाठी परवाना निलंबित झाल्याचं सांगितलं. त्यानंतर मंत्र्यांचे पीए रामदास गाडे यांनी माझी फाईल न बघताच माझ्या फाईलवर दोन लाईन मारल्या आणि म्हणाले, 'राजू यांचं काय ते तुम्ही बघून घ्या. त्या लाईन म्हणजे गाडे आणि ढेरिंगे त्यांचातील सिक्रेट कोडवर्ड असल्याचा दावा निर्मल शर्मा यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भातील एक व्हिडीओही व्हायरल केला आहे.
एक लाईन म्हणजे 50 हजार रुपये तर दोन लाईन म्हणे 1 लाख रुपये ज्यांच्या पेपरवर एक लाईन आहे, त्यांच्याकडून 50 हजार घ्यायचे, ज्यांच्या पेपरवर दोन लाईन आहेत, त्यांच्याकडून एक लाख घ्यायचे. असा गाडे व ढेरिंगे यांच्यातील हा सिक्रेट कोडवर्ड असल्याचा दावा निर्मल शर्मा यांनी केला आहे. त्या लाईन मारुन झाल्यानंतर डॉ. रामदास गाडे यांनी मला पुढचं तुम्ही राजूशी बोला असं सांगितलं. राजू तुम्ही यांना बाहेर घेऊन जा याचं जे काही प्रकरण आहे ते पाहा. म्हणजे हे पैसे देताय की नाही देताय हे विचारून घ्या असा संदेश गाडे यांनी ढेरिंगे यांना त्यातून दिल्याचा दावा निर्मल शर्मा यांनी माध्यमांशी बोलताना केला.
त्यानंतर माझ्याकडे राजू ढेरिंग यांनी एक लाख 10 हजार रुपयांची मागणी केली. त्यात एक लाख वरती देण्यासाठी म्हणजे डॉ. रामदास गाडे यांना देण्यासाठी तर वरचे दहा हजार लिपीक राजू ढेरिंगे यांच्यासाठी असे त्याने सांगितले. पण मी त्यांना विनंती केली तेव्हा राजू ढेरिंगे यांनी मला 50 टक्के डिस्काऊंट देऊ असं सांगितलं. त्यानुसार माझ्याकडे त्याने 55 हजार रुपये मागितले. मला त्यांना ते पैसे द्यावेच लागले. कारण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मी 2000 रुपये राजू ढेरिंगे यांना ऑनलाईन म्हणजे गुगलपे द्वारे दिले आणि 53 हजार कॅशमध्ये दिले. इकडून तिकडून गोळा करुन मी ते पैसे दिले कारण २५ हजार रुपये देण्याचीच माझी कॅपेसीटी होती बाकीचे मी इकडून तिकडून गोळा करुन द्यावे लागले. २८ तारखेला मी हे पैसे त्यांना दिले.
राजू ढेरिंगे याने मला सांगितले की, आमच्या वरती पण दोन-चार लोक आहेत. त्यांनाही पैसे द्यावे लागतात. यासंदर्भातील एक व्हिडीओही माझ्याकडे आहे, त्यात राजू स्पष्टपणे सांगतोय आम्हाला आमच्या वरच्या लोकांना पैसे द्यावे लागतात असा दावा निर्मल शर्मा यांनी केला आहे. सुनावणी ही १३ तारखेला डॉ. रामदास गाडे यांनी घेतली. तेव्हा मंत्री नरहरी झिरवाळ कार्यालयात नव्हते. मी त्यांना भेटून बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या ऑफिसमधील लोकांनी मला भेटून दिलं नाही. त्या लोकांनी मला राजू ढेरिंगे आणि रामदास गाडे यांच्याकडे पाठवले.
निर्मल शर्मा सांगतात की, व्हिडीओत तुम्हाला दिसेल की, रामदास गाडे यांनी दरवाजा उघडला आहे. ते म्हणाले की, बालाजी, तुझी खूप चर्चा आहे. तुझ्यासाठी मला खूप फोन आले. ते असे म्हणाले कारण मी मुख्यमंत्री कार्यालयात रामदास गाडे यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची तक्रारही दिली होती. मंत्रालयात येणाऱ्या 90 टक्के लोकांकडून पैसे घेतले जातात. पैसे दिले तर तुमचे काम होणार नाहीतर तुम्ही तुमचा व्यवसाय बंद ठेवा. तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही आमच्याकडे या मंत्री असो नसो आम्ही तुम्हाला स्टे देणार असं सगळं मंत्रालयात चालतं असे निर्मल शर्मा यांनी सांगितले.
मी रामदास गाडे आणि राजू ढेरिंगे या दोन लोकांना फक्त पाहिले आहे. बाकी यामध्ये कोणी इतर सहभागी आहे किंवा नाही हे मला माहिती नाही. मी इतर कुणाला बघितले पण नाही. रामदास गाडे आणि राजू ढेरिंगे या दोघांशीच माझा प्रत्येकवेळी संपर्क आल्याचं निर्मल शर्मा यांनी सांगितलं. दरम्यान मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मात्र त्यांना या प्रकरणाची कल्पना नसल्याचे सांगितले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.