

MPSC Paper leak : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षकपदाच्या परीक्षा पेपर फुटी प्रकरणी मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने चौकशीचा फास अधिक आवळला आहे. मुंबई पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी (दि. २८) नंदुरबारमध्ये जात कौटिल्य अकादमीवर छापा टाकला.
पेपरफुटीमधील संशयित व अकादमीचा संचालक प्रवीण पाटील याला सोबत घेऊन पोलिसांनी नंदुरबार येथील त्याची कौटिल्य अॅकॅडमी आणि निवासस्थानाची झाडाझडती घेतली. या झडतीत पोलिसांनी संशयास्पद कागदपत्रे, डिजिटल पुरावे, संगणकाची हार्डडिस्क आणि विद्यार्थ्यांची प्रवेश नोंदणी पुस्तके ताब्यात घेतली आहेत.
प्रवीण पाटील याच्या बँक खात्यांचे तपशील आणि अलीकडच्या काळातील प्रवासाची माहिती गोळा केली. तब्बल चार तास पोलिसांनी पाटीलची चौकशी केली. प्रवीण हा स्पर्धा परीक्षा क्लास चालवत असल्याने त्याने आणखी काहीजणांना प्रश्नसंच पुरवल्याचा संशय पोलिसांना आहे.
याप्रकरणात अटकेत असलेले मुख्याध्यापक अमृत पाटील यांनी आपल्या मुलीसाठी पेपर फोडल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पोलिसांनी त्यांच्याही घराची झडती घेतली. तसेच गौरव पाटील यांच्याही घराची झडती घेण्यात आली.
या प्रकरणातील मुख्य संशयितांचे कॉल रेकॉर्डस आणि बँक खात्यांच्या तांत्रिक विश्लेषणानंतर मुख्य संशयित आणि प्रवीण पाटील यांच्यात मोबाईलवरून काही संशयास्पद संभाषण आणि आर्थिक व्यवहार झाल्याचा पोलिसांना संशय आहे. नंदुरबार शहर पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. सायंकाळी प्रवीण पाटीलला सोबत घेऊन पोलिसांचे पथक पुन्हा मुंबईला गेले.
या प्रकरणात ‘MPSC’च्या तीन बड्या अधिकाऱ्यांसह अकादमीचा संचालक प्रवीण पाटील आणि नंदुबार जिल्ह्यातील एका आदर्श मुख्याध्यापकाला मुंबई पोलिसांनी आधीच बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात नंदुरबारसह उत्तर महाराष्ट्रातील काही बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांच्या धडक कारवाईमुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.
अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक , गट-ब, अन्न व औषध प्रशासन या संवर्गाची चाळणी परीक्षा २२ मार्च २०२६ रोजी MPSC मार्फत घेण्यात आली. परंतु या परीक्षेचा पेपर दोन दिवस आधीच फुटला होता. नंदुरबार जिल्ह्यातील परिवर्धा (ता. शहादा) येथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक तथा आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त अमृत पाटील यांनी मुलगी ऋतुजा हिला परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी कौटिल्य अकादमीचा संचालक प्रवीण पाटील याच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका मिळविली होती.
ऋतुजाने परीक्षेच्या दोन दिवस आधी हा पेपर व्हॉट्सॲपवर गौरव पाटील (लोकेश) याला पाठविला होता. १२ जूनला परीक्षेचा निकाल लागला. त्यात ऋतुजा राज्यात सातव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली; पण गौरव अनुत्तीर्ण झाला. यावरून दोघांमध्ये तीव्र वाद झाले. यातून गौरवने थेट ‘MPSC’कडे ई-मेल करून पेपरफुटीची तक्रार नोंदवली आणि नंतर तक्रार मागेही घेतली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.