

Nashik News, Fodder Transport Ban : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पशुधनासाठी चारा राखून ठेवण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा इतर जिल्ह्यांत किंवा राज्याबाहेर वाहतूक करून विक्री करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यासंदर्भात आदेश निर्गमित केले आहेत.
नाशिक जिल्ह्यातील पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता कायम राखण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, जिल्ह्यात उत्पादित होणारा हिरवा चारा, कडबा, कुट्टी, पेंढा, टीएमआर (एकूण मिश्रित पशुखाद्य) तसेच इतर प्रकारच्या पशुखाद्याची जिल्ह्याबाहेर वाहतूक व विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, शासकीय योजना, पशुसंवर्धन विभाग किंवा जिल्हा प्रशासनाने अधिकृत मंजुरी दिलेल्या चारा वाहतुकीला या आदेशातून वगळण्यात आले आहे.
राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने नाशिक जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये ‘ट्रिगर-१’ (प्रथम कळ) दुष्काळ जाहीर केला आहे. नाशिक जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा इतर जिल्ह्यांत तसेच सीमावर्ती भागांत मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी पाठविला जाण्याची शक्यता लक्षात घेता, भविष्यात चाऱ्याची टंचाई निर्माण होऊन पशुधनाच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, अशी बाब प्रशासनाने नमूद केली आहे. जिल्ह्यातील पशुधनाला पुरेसा चारा उपलब्ध व्हावा आणि संभाव्य चारा टंचाई टाळता यावी, या उद्देशाने हा प्रतिबंधात्मक निर्णय घेण्यात आला आहे.
तर कायदेशीर कारवाई...
जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेला हा आदेश १३ ऑक्टोबर २०२६ पासून १० डिसेंबर २०२६ पर्यंत किंवा पुढील आदेश होईपर्यंत लागू राहणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम २२३ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. कारण जिल्ह्यातील चाऱ्याची बाहेर विक्री झाल्यास चारा टंचाई निर्माण होऊन जिल्ह्यातील पशुधनाच्या जगण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संबंधितांनी या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.