

FDA Suspends Licenses of 120 Food Establishments : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरोधात कारवाई केली आहे. एफडीएने १६ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबरदरम्यान नाशिक विभागातील १२० अन्न आस्थापनांचे परवाने निलंबित केले असून, तब्बल तीन कोटी ७८ लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा अन्नसाठा जप्त केला आहे. तब्बल दोन लाख २७ हजार किलोग्रॅम इतका अन्नसाठा जप्त केला आहे.
अन्न व औषध विभागाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे व सहआयुक्त मंगेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकसह विभागातील अहिल्यानगर, जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांमध्ये सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत नाशिकमधील ६५, जळगाव २३, धुळे १३, अहिल्यानगर १० तर नंदुरबार जिल्ह्याती ९ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
सणासुदीच्या काळात विशेषत: दिवाळीत मिठाई, फराळ आणि दुग्धजन्य पदार्थ लोक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. याच संधीचा फायदा घेत काही व्यावसायिकांकडून निकृष्ट दर्जाचे व असुरक्षित अन्नपदार्थ विकले जाण्याची शक्यता लक्षात घेऊन एफडीएकडून ही विशेष मोहीम राबविण्यात आली. यामध्ये मिठाई, चिवडा, खाद्यतेल, मसाले, फरसाण, खोया, बटर, पॅक ड्रिंकिंग वॉटर, खवा, मावा आणि भगर यांसारख्या अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. यात प्रामुख्याने मसाले, खाद्यतेल, मिठाई व फरसाण यांचा समावेश आहे.
यामध्ये अस्वच्छ व अयोग्य परिस्थितीत उत्पादनाची साठवणूक करण्यात आलेली दिसली. तसेच अन्नपदार्थ विहित गुणवत्ता मानकांनुसार नसल्याचा संशय आढळला. अन्नपदार्थांच्या लेबलिंग नियमांचे उल्लंघन करून चुकीच्या पद्धतीने ब्रँडिंग करण्यात आलेलं होतं.
खाद्यतेलाच्या पुनर्पेकिंगसाठी वापरलेल्या डब्यांचा बेकायदेशीर पुनर्वापर होत असल्याचे समोर आले. तसेच पॅकिंगवर ‘Fortified Oil’ असा दावा असताना, वैध फोर्टिफिकेशन परवाना आढळला नाही. मिठाई तयार करताना विहित मर्यादेपेक्षा जास्त खाद्यरंगाचा वापर केल्याचे निदर्शनास आले.
तक्रारीसाठी वेबसाईट
नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार असल्याचे एफडीए कडून सांगण्यात आले. अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत शंका असल्यास नागरिकांनी complaints.mahafda.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, तसेच अन्न व्यावसायिकांनी परवाना घेऊनच नियमांनुसार व्यवसाय करावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने (FDA) केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.