Nashik News : जाहिराती दिसेनात म्हणून 55 झाडांची रातोरात कत्तल ; एजन्सीचालकासह सहा जणांना बेड्या, ‘हरित नाशिक’च्या संकल्पनेलाच तडा

Nashik tree cutting case : गंगापूर रोडवरील दुभाजकांमध्ये काही ठिकाणी जाहिराती लावल्या आहेत. मात्र, दुभाजकांमधील वाढलेल्या झाडांमुळे या जाहिराती स्पष्ट दिसत नसल्याने या झाडांची कत्तल करण्यात आली.
Nashik tree cutting case
Nashik tree cutting caseSarkarnama
Published on
Updated on

Nashik tree cutting : वाढलेल्या झाडांचा अडसर होत असल्याने दुभाजकामध्ये लावलेल्या जाहिराती स्पष्ट दिसत नाही, म्हणून एका जाहिरात एजन्सीचालकाने काही जणांना हाताशी धरुन त्यांना दहा हजार रुपये देऊन तब्बल ५५ झाडांची रातोरात कत्तल केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे.

या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी कारवाई करत जाहिरात एजन्सीचालकासह सहा जणांना अटक केली. न्यायालयाने संशयितांना सोमवारपर्यंत (दि. २१) चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. रस्त्यावरील जाहिरात फलक प्रवाशांना स्पष्ट दिसावा आणि झाडांचा अडसर दूर व्हावा, याच उद्देशाने मध्यरात्री कटरच्या साहाय्याने या झाडांची कत्तल केल्याचे निष्पन्न झाले आहे.

यांना केली अटक

अभिमन काशीनाथ खैरनार (३७, रा. मालेगाव), दिलीप सदू बेंडकुळे (३४), दीपक संतोष दाते (२५), रोहिदास पांडुरंग खुरखुटे (४५), अर्जुन दत्तू चारोस्कर (३८) आणि नम्रता जाहिरात संस्थेचा चालक मच्छिंद्र विजय देशमुख (४४, सर्व रा. नाशिक) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

Nashik tree cutting case
Nashik News : नाशिकमधील खोदलेल्या रस्त्यांनी घेतला आणखी एक बळी, महापालिकेसमोर मृतदेह ठेवून नागरिकांचा ठिय्या

नाशिक महापालिकेचे अधिकारी श्रीकांत किसन इरणक यांनी याप्रकरणी फिर्यादी दिली, शहर सुशोभिकरणाच्या उद्देशाने गंगापूर रोडवरील दुभाजकात इंडियन ख्रिसमस ट्री प्रजातीची झाडे लावण्यात आली होती. ३० ऑगस्ट रोजी रात्रीच्या अंधारात अभिमन खैरनार याने वीज कटरने या मार्गावरील ५५ झाडे कापून टाकली. हा प्रकार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला होता. मात्र, तब्बल १५ दिवसांनी हा प्रकार महापालिकेच्या निदर्शनास आला.

नम्रता जाहिरात संस्थेने गंगापूर रोडवरील दुभाजकात जाहिरात फलक उभारण्याचा ठेका घेतला होता. फलक उभारण्यासाठी दुभाजकातील झाडांचा अडथळा येत असल्याने मच्छिंद्र देशमुख याने अभिमन खैरनार याला झाडे तोडण्यासाठी दहा हजार रुपये दिल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्यानंतर खैरनार याने तीन मजुरांच्या मदतीने वीज कटरने ५५ झाडे कापली.

Nashik tree cutting case
नाशिक महापालिकेच्या लोगोमध्ये नारोशंकराची घंटा का आहे?

दीपक बेंडकुळे याने कत्तल केलेली झाडे वाहनातून वाहून नेल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकारामुळे महापालिकेच्या सुमारे दोन लाख ७५ हजारांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेला केवळ झाडांची कत्तल म्हणून न पाहाता सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, पर्यावरणाची हानी व शहराचे विद्रुपीकरण या गंभीर बाबी म्हणून पाहिले जात आहे. गंगापूर पोलिसांकडून संशयितांची चौकशी सुरु आहे.

एकीकडे नाशिकमधील आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकासकामांसाठी होणाऱ्या वृक्षतोडीवरून नाशिकमध्ये प्रशासन आणि पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आता हरित नाशिकची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी शहरात ठिकठिकाणी वृक्षलागवड आणि संवर्धनाचे प्रयत्न सुरु आहेत. अशात निदर्यीपणे ५५ झाडांची कत्तल करण्यात आल्याचा हा प्रकार बघून वृक्षप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. हरित नाशिकच्या संकल्पनेला या प्रकारामुळे धक्का बसला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com