

Nashik MLC Election : नरेंद्र दराडे यांनी आपली ताकद वापरून नाशिक विधानपरिषदेची महायुतीची अधिकृत उमेदवारी खेचून आणली. प्रतिस्पर्धी गोकुळ गीतेंच्या भावाला म्हणजे भाजपच्या गणेश गीते यांना माघार घ्यायला लावली. गोकुळ गिते यांच्यावर दबाव आणत प्रचार थांबवण्याची घोषणा करायला भाग पाडलं.
पण एवढं सगळं करूनही गोकुळ गीते गनिमी कावा करत मतदारांपर्यंत पोहचले होते. मतमोजणीच्या दिवशी पहिल्याच फेरीत त्यांनी नरेंद्र दराडेंची पाट लावली. स्वतःच्या घरात फक्त एक मत असताना 357 मते घेऊन अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले.
दराडेंना धोबीपछाड देत त्यांची पाट लावल्यानंतर नवनिर्वाचित आमदार गोकुळ गितेंनी काही तासांत दुसरा डाव टाकला. त्यांनी निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय जाहीर केला.
त्यांनी कालच्या काल मुंबईत जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. आपण शिवसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून विधान परिषदेत काम करणार असल्याचे स्पष्ट केलं. गिते एकनाथ शिंदेंच्या ताफ्यात जाऊन बसल्याने त्यांचे बंधू गणेश गिते व मंत्री महाजन हे सेफ झोनमध्ये गेले आहेत.
नरेंद्र दराडे यांचा विजय एकनाथ शिंदेंनी प्रतिष्ठेचा केला होता. त्यासाठी त्यांनी मोठी फिल्डिंग लावली होती. त्यासाठी भाजपकडून दगाफटका न होण्याची जबाबदारी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर होती. मात्र, प्रत्यक्षात दगाफटका झाल्याने महाजनांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं.
गितेंच्या विजयानंतर नरेंद्र दराडे यांनीही पराभवाचे खापर महाजन यांच्यावरच फोडलं. महाजन यांनी गितेंना ताकद देत महायुतीच्या उमेदवारासोबत गद्दारी केल्याचे दराडे म्हणाले.
नाशिकच्या निकालानंतर महायुतीत संघर्ष होण्याची शक्यता लक्षात घेत पुढच्या काही तासांमध्ये गितेंनी थेट एकनाथ शिंदे यांच्या दरबारी हजेरी लावली. यामुळे महाजनांभोवतीचे संशयाचे मळभ दूर झाले. त्याचवेळी गोकुळ गिते यांचे बंधू गणेश गिते यांचे एक प्रकरण सत्ताधारी पक्षाकडून उघडकीस आणण्याचे प्रकार थांबण्यासाठी हा प्रवेश महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
गोकुळ गिते यांनी निवडून आल्यानंतर दुहेरी डाव टाकत मंत्री महाजन यांच्यासह आपले बंधू गणेश गिते दोघांना सेफ केलं. दुसरीकडे गितेंनी शिवसेनेचे सहयोगी सदस्यत्व घेतल्याने दराडे हरले असले तरी या निवडणुकीत शिंदेच जिंकले. दराडेंच्या पराभवाने नाशिकची हातातून गेलेली जागा गोकुळ गितेंच्या रुपाने शिंदेंनी भरुन काढली. त्यामुळे महाजन यांच्यासह गणेश गितेंवरचा शिंदेंचा राग शांत झाला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.