

Nashik MLC Election : नाशिकमध्ये विधानपरिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी महायुतीचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव केला आहे. पहिल्याच फेरीत विजयासाठी आवश्यक असलेली मते मिळवत गोकुळ गीते यांनी नाशिकच्या वर्तुळात ऐतिहासिक विजय नोंदवला. या विजयाने नाशिकच्या राजकारणात पुन्हा एकदा दराडे पॅटर्न राबवू पाहणाऱ्या येवल्यातील दराडे बंधूंना मोठा धक्का बसला.
नाशिकमध्ये एकूण मतदार संख्या 619 इतकी होती. त्यात मालेगावच्या एका मतदाराने मतदान केलं नाही. एकुण 618 नगरसेवकांनी मतदान केलं. परंतु त्यातील 13 मते अवैध ठरली. विजयासाठी आवश्यक कोटा 303 मतांचा ठरवण्यात आला. पहिल्याच फेरित अपक्ष गोकुळ गितेंना हा कोटा पूर्ण केला. गोकुळ गितेंना पहिल्या पसंतीची 357 मते मिळाली. तर नरेंद्र दराडे यांचा रथ 248 वर थांबला. तब्बल 109 मतांच्या फरकाने नरेंद्र दराडेंना धूळ चारली.
या निवडणुकीत महायुतीचा घटक पक्ष असलेल्या भाजप व राष्ट्रवादीची 218 मते फुटली. अन् शिवसेना-महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा घात झाला. यात सर्वाधिक मते भाजपची फुटल्याचे बोलले जात आहे. पक्षीय बलाबल पाहाता राष्ट्रवादी सोडून द्या, एकटा भाजप जरी दराडेंच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभा राहिला असता तरी त्यांचा विजय निश्चित होता. दराडे बंधूंनी देखील या पराभवाचे खापर भाजपवरच फोडले आहे. भाजपने विश्वास घात केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
नरेंद्र दराडे यांनी आपली ताकद वापरत अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांचे बंधू गणेश गिते यांना माघार घ्यायला लावली. पण गोकुळ गिते रिंगणात उरले होते. त्यांच्यावरही प्रचंड दबाव आणत त्यांना प्रचार थांबवण्याची घोषणा करण्यास भाग पाडण्यात आलं.
मात्र, गोकुळ गितेंनी गनिमा कावा करत दराडेंची पाट लावली. स्वत:च्या घरात केवळ एकच मत असतानाही तब्बल 357 मते गोकुळ गिते खेचू शकले कारण भाजपचा अदृश्य हात त्यांच्या मागे होता हे आता स्पष्टपणे उघड झाले आहे. भाजपने अतिशय शांत डोक्याने खेळी करत नरेंद्र दराडेंचा राजकीय बळी दिला आहे.
नाशिक शिक्षक व आणि पदवीधर मतदारसंघाच्या २०२४ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या वेळी देखील नरेंद्र दराडे यांचे बंधू किशोर दराडे थोडक्यात वाचले होते. त्यावेळेही भाजपच्या दोघांनी किशोर दराडेंच्या विरोधात शड्डू ठोकला होता. त्यात राधाकृष्ण विखे-पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे-पाटील यांना शेवटच्या क्षणी माघार घ्यायला लावली होती. त्यापूर्वी त्यांना नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतूनही माघार घ्यावी लागली होती. त्यानंतर शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीचा अर्जही मागे घ्यायला सांगितल्याने ते नाराज झाले होते.
अर्ज माघारी घेण्यासंदर्भात राधाकृष्ण विखे पाटील आणि राजेंद्र विखे याच्यात बंद दाराआड दीर्घकाळ चर्चा झाली. यानंतर राजेंद्र विखे यांनी शेवटच्या क्षणी निवडणूक अधिकाऱ्यांकडे प्रतिनिधी पाठवून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता.
मात्र, तरीही शिवसेना शिंदे गटाचे महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांचे टेन्शन पूर्णपणे मिटले नव्हते. कारण भाजपशीच संबधित असलेले विवेक कोल्हे यांनी आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवली होती. त्यामुळे किशोर दराडेंची धाकधूक कायम होती. मात्र, प्रत्यक्षात निवडणुकीत, आमदार दराडे यांना 26 हजार 476 मते मिळाली होती. अपक्ष विवेक कोल्हे यांना 17 हजार 372 मते मिळाली. त्यामुळे इथे कोल्हे यांना रसद कमी पडली असे म्हणता येईल. भाजपच्या एका उमेदवाराची माघार झाली तर दुसऱ्याला रसद कमी पडल्याने किशोर दराडे थोडक्यात बचावले. नाशिकच्या निवडणुकीत मात्र अपक्ष गोकुळ गिते यांना व्यवस्थित रसद मिळाली. त्यामुळे नरेंद्र दराडे यांचा करेक्ट कार्यक्रम झाला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.