

Nashik MLC Election : नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीची राज्यभरात सर्वाधिक चर्चा झाली. गोकुळ गिते व प्रसाद हिरे या दोन्ही अपक्ष उमेदवारांनी प्रचार थांबवल्याने आता रिंगणात केवळ महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे हेच उरले आहेत.
मात्र, तरीही तांत्रिक दृष्ट्या माघारीची वेळ संपून गेल्याने गिते व हिरे दोघांची नावे मतपत्रिकेवर असणार आहेत, त्यादृष्टीने महायुतीमध्ये धाकधूक कामय असून खबरदारी घेण्यात येत असल्याचं दिसत आहे. एकुण ६१९ मतदान आहेत. त्यापैकी जवळपास ४५० मतांचे महायुतीकडे स्पष्ट बहुमत आहे. तरीही दगाफटका टाळण्यासाठी महायुती सावध पावले उचलताना दिसत आहे.
दोन्ही अपक्षांनी माघार घेतली असली तरी गोकुळ गिते यांनी दराडेंना जाहीर पाठिंबा दर्शवलेला नाही. त्यांनी केवळ आपण प्रचार थांबवत असल्याचं म्हटलं होतं. शिवाय या निवडणुकीत व्हीप बजावण्याची अधिकृत तरतूद नसते. त्यामुळे मतदार आपल्या मर्जीनुसार मतदान करण्यास पूर्णपणे स्वतंत्र असतात. ऐनवेळी मने वळवून किंवा अंतर्गत नाराजीचा फायदा उठवून अपक्ष उमेदवारांनी मतदान फिरवू नये, यासाठी महायुतीने 'रिसॉर्ट पॉलिटिक्स'चा अवलंब केला असावा अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
'अभ्यास वर्ग' आणि मंत्र्यांचे सत्र
शिवसेनेच्या सर्व मतदार नगरसेवकांना कालच ठाण्यातील एका अलिशान हॉटेलमध्ये हलवण्यात आलं आहे. त्यानंतर आज-उद्या राष्ट्रवादी व भाजपचे नगरसेवकही ठाण्याच्या दिशेने रवाना होणार असल्याचे समजत आहे. सर्व लोकप्रतिनिधींना थेट मतदानाच्या दिवशीच म्हणजे 18 जून रोजी नाशिकमध्ये आणले जाणार आहे.
या निवडणुकीत पसंतीक्रमानुसार मतदान पद्धती असते. त्यादृष्टीने नगरसेवकांसाठी हॉटेलमध्ये 18 जूनपर्यंत वेगवेगळ्या सत्रांचे आयोजन केले जाणार आहे. शिवसेनेचे नेते व उपमहापौर विलास शिंदे यांनी सांगितले की, महायुतीचे अनेक सदस्य हे नवीन आहेत. त्यांना पसंतीक्रमाच्या गुंतागुंतीच्या मतदान पद्धतीचा अभ्यास करून देण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
तसेच, गिरीश महाजन, दादा भुसे आणि उदय सामंत हे महायुतीचे मंत्री नगरसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत. तर मतदानाच्या एक दिवस आधी 17 जून ला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री नाशिकच्या मतदारांना सहलीच्या ठिकाणीच विशेष मार्गदर्शन करणार असल्याचे देखील समजते आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.