

Nashik MLC Election : विधान परिषद निवडणुकीची घटिका जवळ आली असून दहा दिवसांवर मतदान आहे. मात्र, असे असताना नाशिकमधील महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यापुढील अडचणी आजून कमी झालेल्या नाहीत. त्यांच्याविरोधात अपक्ष रिंगणात उतरलेल्या भाजपच्या दोन्ही बंडखोरांनी अद्याप माघार घेतलेली नाही.
दराडे यांच्या विरोधात भाजपचे प्रसाद हिरे व गोकुळ गिते या दोन नेत्यांनी बंडखोरी करत निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. गोकुळ गिते यांनी तर प्रचारही सुरु केला आहे. त्यांच्या मनधरणीसाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरु आहेत.
यातच आता भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे यांनी आज थेट नाशिकमधील भाजप कार्यालयाला भेट दिली. मला माघार घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा मंत्री गिरीश महाजन यांनी कोणतीही सूचना दिली नाही असा धक्कादायक खुलासा करत त्यांनी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. सूचना द्यायला त्यांची आणि माझी भेटच झालेली नाही असा बचाव त्यांनी केला.
याशिवाय आपण अर्ज भरताना मंत्री गिरीश महाजन यांची परवानगी घेऊनच भरला होता असाही खुलासा त्यांनी केला आहे. जागा सुटेल की नाही माहित नाही, आम्ही प्रयत्न करत आहोत. पण फॉर्म भरुन ठेवा असं महाजनांनी सांगितलं होतं असं हिरे म्हणाले.
प्रसाद हिरे यांनी थेट भाजप कार्यालयात हजेरी लावल्याने दराडे समर्थकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, यावेळी प्रसाद हिरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, भाजप माझा पक्ष आहे आणि हे माझे कार्यालय आहे. यासाठीच मी भाजप शहराध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी आलो होतो. मी निवडणुकीतून माघार घेतलेली नाही, माझा विजय नक्की आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान आपल्याला माघार घेण्यासदंर्भात मंत्री गिरीश महाजन किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अन्य कोणीही अद्याप सूचना दिलेली नाही. असे म्हणत त्यांनी माघारीच्या चर्चा फेटाळल्या. मी गिरीश महाजन यांची भेट घेणार आहे, त्यानंतर ते जे काही आदेश देतील त्यावर पुढील योग्य तो निर्णय घेऊ अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
यावेळी महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यावर त्यांनी टीकेची तोफ डागली. ते म्हणाले, शिवसेनेच्या नेत्यांनी काल माझ्याशी संपर्क केला. मंत्री उदय सामंत यांच्याशी माझी काल दीड तास चर्चा झाली. त्यात समोरचा उमेदवार हा किती कुचकामी आहे ते आपण त्यांना पटवून दिल्याचं हिरे म्हणाले.
सहा वर्षात समोरचा उमेदवार कुणाच्याही उपयोगी पडला नाही. या उमेदवाराने अनेकांची फसवणूक केलेली आहे. असा आरोप हिरे यांनी केला. त्यामुळे त्यांचा पराभव पक्का असल्याचं हिरे म्हणाले. माझी बंडखोरी भारतीय जनता पक्षातील कोणत्याही उमेदवारा विरोधात नाही. दराडेंना मी शिवसेनेचाच उमेदवार समजतो महायुतीचा नाही. मला फक्त समोरचा उमेदवार पसंत नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. संवैधानिक पद्दतीने व प्रेमाने मी लोकांची मने जिंकणार आहे व निवडणूक लढवणार असल्याचं प्रसाद हिरे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.