

Dongrale Murder Case : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात घडलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण, अत्याचार आणि खून प्रकरणातील आरोपी विजय खैरनार याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने पीडित मुलीच्या कुटुंबाला १० लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेशही दिले आहेत. मालेगाव जिल्हा व अपर सत्र न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
१६ नोव्हेंबर २०२५ रोजी ही घटना घडली होती. नराधम विजय खैरनार याने साडेतीन वर्षीय चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून, तिचे अपहरण करत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिची दगडाने ठेचून हत्या केली होती.
याप्रकरणी मालेगाव जलदगती न्यायालयात हा खटला चालवण्यात आला. आरोपीला फाशीची शिक्षा होते की जन्मठेप याकडे लक्ष लागले होते. या खटल्याचा आज निकाल लागला आहे. कोर्टाने दोषी विजय खैरनार याला फाशीची शिक्षा सुनावली आहे.
या घटनेच्या निषेधार्थ विविध ठिकाणी आंदोलने आणि मोर्चे काढण्यात आली होती. मालेगावात संतापाचे वातावरण होते. हे प्रकरण जलद गती कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी चिमुकलीच्या परिवारासह नागरिकांनी केली होती. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता शासनाने ज्येष्ठ विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांची सरकारी पक्षाच्या वतीने बाजू मांडण्यासाठी नियुक्ती केली होती.
मालेगाव येथील जिल्हा व अपर सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावली झाली. गेल्या दहा महिन्यांच्या कालावधीत न्यायालयात एकूण ५० सुनावण्या पार पडल्या. अतिशय जलद खटला चालवत अवघ्या दहा महिन्यात कोर्टाने खैरनारला फाशीची शिक्षा सुनावली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी अलिकडेच २२५ पानांचं आरोपपत्र कोर्टात दाखल केलं होतं. पीडितेच्या बाजूने पोलीस अधिकारी, ग्रामस्थ, पीडितेचे कुटुंबीय आणि वैद्यकीय अधिकारी यांच्यासह एकूण २४ महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. आरोपी खैरनारच्या बाजूनेही दोन साक्षीदार तपासण्यात आले होते.
आरोपी विजय खैरनारला देखील स्वतःची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. त्याच्या वर्तनासंदर्भातील अहवालही न्यायालयात सादर करण्यात आले होते. यामध्ये कारागृहातील अधिकाऱ्यांसह मानसोपचार तज्ज्ञ आणि पोलिसांनी दिलेल्या अहवालांचा समावेश होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.