

Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात सुरू असलेल्या विकासकामांतील निष्काळजीपणामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सातपूर परिसरातील रस्ते खोदकाम आणि अपुऱ्या सुरक्षाव्यवस्थेमुळे एका माजी सैनिकाचा मृत्यू झाल्यानंतर सत्ताधारी पक्षांच्या नगरसेवकांनी ठेकेदाराविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
सातपूर परिसरात सुरू असलेल्या विकासकामांदरम्यान रस्ते खोदून ठेवण्यात आले असून सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या निष्काळजीपणामुळे माजी सैनिक प्रवीण गायकवाड यांचा मृत्यू झाल्याने शहरभर संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेनंतर भाजपचे नगरसेवक दिनकर पाटील यांनी ठेकेदारांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. त्यांच्यासोबत भाजपच्या नगरसेविका भारती देवरे, संगीता घोटेकर तसेच नगरसेवक अमोल पाटील यांनीही संबंधित ठेकेदाराला धारेवर धरले. त्यामुळे नागरिकांच्या नाराजीला अधिक तीव्र स्वर मिळाला आहे.
ठाणे येथील ईगल इन्फ्रा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीविरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधित अनेक विकासकामांचे ठेके शहराबाहेरील कंत्राटदारांना देण्यात आल्याचा आरोप होत असून, त्यांच्या कामकाजावर प्रभावी नियंत्रण नसल्याची टीका केली जात आहे.
नगरसेवक दिनकर पाटील यांनी महापालिकेच्या युटिलिटी प्रकल्पांमधील बहुतांश ठेकेदार बाहेरचे असल्याने ते स्थानिक प्रतिनिधी किंवा नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करतात असे सांगितले. “या अनागोंदी कारभारामुळे आणखी किती नागरिकांचे बळी जाणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच माजी सैनिक गायकवाड यांच्या कुटुंबीयांना योग्य भरपाई देण्यात यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणावर रस्ते खोदकाम सुरू आहे. अनेक मार्ग एकेरी किंवा बंद करण्यात आल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर विकासकामांतील निष्काळजीपणा, वाहतूक कोंडी आणि सुरक्षेच्या प्रश्नांवरून नागरिकांचा रोष वाढत असून, आता सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांनीही उघडपणे नाराजी व्यक्त केल्याने हा मुद्दा अधिकच चर्चेत आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.