

NEET coaching classes Maharashtra : देशभरात नीट पेपरफुटी प्रकरणावरून गदारोळ सुरू असतानाच, राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी खासगी कोचिंग क्लासेसविरोधात जोरदार भूमिका घेत मोठी मागणी केली आहे.
राज्यातील प्रत्येक महाविद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये सरकारने ‘नीट’चे क्लासेस अनिवार्य करावेत, अशी मागणी त्यांनी केली. तसेच खासगी क्लासेसवर तात्काळ बंदी घालण्याचीही त्यांनी भूमिका मांडली.
नीट पेपरफुटीप्रकरणाचे धागेदोरे अहिल्यानगरमध्ये (Ahilyanagar) समोर आल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना, मंत्री विखे पाटील यांनी खासगी कोचिंग क्लासेस आणि काही राजकीय पुढाऱ्यांच्या संगनमतावर गंभीर आरोप केले. “राज्यात अनेक पुढाऱ्यांनी सुरू केलेली आर्ट्स आणि कॉमर्स महाविद्यालये खासगी कोचिंग क्लासेसवाल्यांकडे चालवण्यासाठी दिली आहेत.
यातून आर्थिक हिस्सेदारी घेतली जाते, हा अत्यंत वाईट प्रकार आहे,” असा आरोप त्यांनी केला. “ज्या महाविद्यालयांचा कारभार खासगी क्लासेसवाल्यांकडे दिला गेला आहे, त्यांची मान्यता तात्काळ रद्द झाली पाहिजे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचेही लक्ष वेधणार आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
खासगी कोचिंग क्लासेसकडून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप करताना विखे पाटील म्हणाले, “दोन-दोन, तीन-तीन लाख रुपये फी आकारून पालकांना लुबाडले जाते. कोचिंग क्लासेस हा आता स्टेटस सिम्बॉल झाला आहे. गुणवत्तेपेक्षा पैशांना महत्त्व दिले जात असून, त्यामुळे होतकरू विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे.”
सरकारी अनुदानित महाविद्यालयांतील शिक्षकांच्या उत्तरदायित्वावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “सरकार महाविद्यालयांवर मोठ्या प्रमाणात खर्च करते. सहावा-सातवा वेतन आयोग, जुनी पेन्शन अशा मागण्या केल्या जातात; मात्र विद्यार्थ्यांचा दर्जा वाढवण्याची जबाबदारी कोणाची? विद्यार्थी कोचिंग क्लासेसकडे का वळतात, याचाही विचार झाला पाहिजे,” असे ते म्हणाले.
राज्यातील सर्व महाविद्यालये आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये सरकारने नीटचे क्लासेस सुरू केले, तर खासगी कोचिंग क्लासेसचा व्यवसाय आपोआप बंद पडेल, असा दावा करत विखे पाटील यांनी शिक्षण व्यवस्थेतील अपयशावरही बोट ठेवले. “एका क्लासमध्ये चार ते पाच हजार विद्यार्थी शिकत असतील, तर मग महाविद्यालये नेमकं करत काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.