

Rahuri Election Update : राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोट निवडणुकीसाठी राजकीय रंगती तालीम सुरू झाली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने मुंबईत सर्वाधिक बैठका होत आहे. या पोट निवडणुकीत राहुरी मतदारसंघातील राजकीय पट वेगळ्यापद्धतीने मांडला जाण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञ वर्तवत आहेत.
राहुरीच्या पोट निवडणुकीत महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष एन्ट्री करणार असल्याचे संकेत मिळू लागले आहे. काँग्रेसच्या पाठिंब्याने महादेव जानकर राहुरी पोट निवडणुकीत आपला पक्ष उतरवेल, अशी शक्यता आहे. महाविकास आघाडी इथं नेमकी कोणती भूमिका घेत, हे मात्र अजून गुलदस्त्यातच आहे.
राहुरी पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) मतदारसंघात आक्रमक भूमिकेत आहे. भगवा पंचा खांद्यावर घेतल्याबरोबर ते भाजपकडून जाणार, असे संकेत दिलेत. तशा चर्चा सुरू आहे. पण भाजपकडून इच्छुक असलेले दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले देखील फिल्डिंग लावून आहेत. त्यामुळे भाजपकडून कोण? अन् महाविकास आघाडीचा उमेदवार कोण? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
भाजपचे (BJP) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुरी आणि बारामती मतदारसंघाच्या पोटनिवडणुका बिनविरोध करण्याचं आवाहन केलं आहे. पण निवडणुका लादल्यास, त्या लढू असे देखील संकेत दिलेत. काँग्रेसचे विधिमंडळातील नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपला सणसणीत, उत्तर देत, त्यांचा त्यांच्या राजकीय इतिहासाची आठवण करून दिली आहे.
विजय वडेट्टीवार यांच्या या आक्रमक भूमिकेवरून, दोन्ही मतदारसंघात काँग्रेस राजकीय गणितं आखणार असल्याचे संकेत मिळाले होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ त्यानुसार आज अॅक्टिव्ह दिसले. महादेव जानकर यांच्याबरोबर बैठक घेतली. बारामतीपेक्षा राहुरीत महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
प्राजक्त तनपुरे हे, भाजपकडे झुकले असतानाच, काँग्रेसने महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला बरोबर घेण्याची भूमिका, ही तनपुरेंना राजकीय चॅलेंज ठरू शकतं, अशी शक्यता वर्तवली जात आहे. जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाची वाटचाल पाहिल्यास, या पक्षाची स्थापन अहिल्यानगरमध्ये झाली आहे.
महादेव जानकर यांच्या या राष्ट्रीय समाज पक्षाला मात्र याच अहिल्यानगरमध्ये खातं उघडता आलेलं नाही. महादेव जानकर यांनी तशी जाहीरपणे खंत देखील बोलून दाखवली आहे. या पोट निवडणुकीच्या निमित्ताने महादेव जानकर यांना अहिल्यानगरमध्ये खातं उघडण्याची संधी मिळेल, असे सांगितले जात आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडी इथं नेमकी कोणती भूमिका घेणार, याकडे आता लक्ष लागलं आहे.
प्राजक्त तनपुरे, अक्षय कर्डिले हे दोघेही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे हे मात्र निश्चित आहे. दोघंही भाजपकडे फिल्डिंग लावून आहेत. प्राजक्त तनपुरे यांच्यासाठी मुंबईत त्यांचे मामा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंतराव पाटील प्रयत्नशील असल्याचे सांगितले जात आहे. अक्षय कर्डिले यांच्यासाठी भाजपचे अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप हे प्रयत्नशील आहेत.
या दोघांमध्ये भाजपची उमेदवारी कोणाला मिळणार याची उत्सुकता आहे. तनपुरे हे भाजपबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा देखील दरवाजा खुला ठेवलेला असल्याचे दिसते. तनपुरे यांनी नुकताच पत्रकार परिषदे, मी शरद पवार यांचा कार्यकर्ता आहे, असे म्हटलं आहे. पण राहुरी पोट निवडणुकीत, काँग्रेस पक्ष महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून उमेदवार देण्याचं ठरवल्यास, तनपुरे अन् कर्डिले यांच्या दुहेरी लढत तिहेरी होऊ शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.