Jalgaon News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी रावेर लोकसभा मतदार संघ मोठ्या विश्वासाने पक्षाकडे घेतला आहे. त्यांनी विश्वासाने उमेदवारी देऊनही एकनाथ खडसे तब्बेतीच्या कारणामुळे नकार देत असतील तर या मतदारसंघातून आपण उमेदवारी लढण्यास तयार आहोत. केवळ कोणी उमेदवारी घेत नाही म्हणून आपण लढतोय असे नव्हे तर आपली निवडून येण्याची धमकही आहे, असा खळबळजनक बॉम्ब माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते डॉ.सतीश पाटील यांनी केला आहे.
जळगाव जिल्हयात रावेर व जळगाव दोन लोकसभा मतदारसंघ आहेत.महाविकास आघाडीत जळगाव मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाकडे आहे. तर रावेर लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपने विदयमान खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना उमेदवारी जाहीर केल्याने पेच निर्माण झाला आहे. या मतदारसंघातून भाजप उमेदवार रक्षा खडसे यांचे सासरे एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गटातर्फे निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली होती.
मात्र, आता त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण तब्येतीमुळे लढू शकत नसल्याचे कळवले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीचा पेच निर्माण झाला आहे. पक्षातर्फे माजी जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रभैय्या पाटील व माजी आमदार संतोष चौधरी यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.परंतु अद्याप पक्षातर्फे उमेदवारीबाबत कोणताही निर्णय झालेला नसल्याचे सांगण्यात आले.
रावेरच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार पक्षाच्या उमेदवारांच्या लढतीत आता पक्षाचे माजी आमदार डॉ.सतीश पाटील यांनीही उडी घेतील आहे. ते म्हणाले रावेर लोकसभा मतदार संघ शरद पवार यांनी मोठ्या विश्वासाने आपल्या पक्षाकडे घेतला आहे.त्यामुळे पक्ष जोरदारपणे हा मतदार संघ लढविणार आहे. पक्षातर्फे ज्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला होता,ते जर नकार देत असतील तर आपणही या मतदार संघातून लढण्यास तयार आहोत असा दावा त्यांनी केला आहे. शरद पवार यांच्यासाठी आपण ही जबाबदारी घेण्यास तयार आहोत.
पक्षातर्फे उमेदवार नाही म्हणून आपण या मतदारसंघातून लढण्यास तयार आहोत. अर्थात केवळ ‘नाईट वॉचमन’म्हणून वेळ मारून नेण्यासाठी आपण लढणार आहोत. असे कोणी म्हणणार असतील तर ते चुकीचे आहे. या मतदार संघातील जनतेला परिवर्तन हव आहे. आणि आपल्या उमेदवारीच्या माध्यमातून ते असणार आहे. या मतदार संघात काही जण आपली ‘मोनॉपॉली’असल्याप्रमाणे काम करीत आहेत.त्यामुळे आपण या मतदार संघात एक विकासात्मक आणि शाश्वत काम करणारा उमेदवार म्हणून लढत देणार आहोत. या मतदारसंघातील जनता आपल्यावर विश्वास ठेवतील याचीही आपल्याला खात्री आहे.
रावेर लोकसभा मतदार संघातून ॲड.रविंद्र पाटील व संतोष चौधरी यांच्या नावाची पक्षाकडे चर्चा सुरू आहे. दोन्हीही चांगले उमेदवार आहेत. दोघांनीही तयारी दाखविली आहे. जर त्यांच्या पैकी कोणालाही उमेदवारी दिली तर आपण त्यांचा प्रचार करण्यास तयार आहोत,परंतु पक्षाने आपल्याला संधी दिली तर आपल्या साथीला असतील याचाही आपल्यावर विश्वास असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
आपण जळगाव लोकसभेतील पारोळा मतदारसंघातील आहोत. त्यामुळे आपण जळगाव लोकसभा मतदार संघातूनच काही नाही लढत असा प्रश्न उपस्थित केला असता, ते म्हणाले, कि जळगाव लोकसभा आपण सन २०१४ मध्ये आपण सक्षमपणे लढलो परंतु त्यावेळी मोदी लाट असल्यामुळे आपल्याला यश मिळाले नाही. आता हा मतदार संघ महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे पक्षाकडे आहे.त्यांच्याकडेही उमेदवार आहेत. मात्र रावेर लोकसभा सक्षमपणे लढण्यासाठी शरद पवार यांनी हा मतदारसंघ आपल्याकडे घेतला,त्यावेळी पक्षातील लोकांनी उमेदवारीची तयारीही दर्शविली आणि आता तब्येतीचे कारण सांगून ते आता माघार घेत आहेत. असा आरोप त्यांनी पक्षाचे विद्यमान आमदार एकनाथ खडसे यांच्यावर नाव न घेता केला. त्यामुळे आपण कडवी लढत देण्यासाठी हा दावा केला आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.