

Illegal Sand Transport : अहिल्यानगरमध्ये वाळू माफियांची दहशत किती वाढली आहे, याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई केल्याच्या राग मनात धरून वाळू माफियांनी सहायक मोटार वाहन निरीक्षक महिलेच्या पतीलाच टार्गेट केल्याचा आरोप आहे.
आरोपींनी आधी पती-पत्नीला ठार मारण्याची धमकी दिली. ही धमकी देताना, चाकू व गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून पतीच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे लॉकेट वाळू चोरांनी लुटून नेल्याचा आरोप आहे. तसेच नोकरी घालवण्याची धमकी देत त्यांच्याकडे तब्बल अडीच लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी राहुल रामदास गर्जे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी (Police) 11 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुधीर शिरसाठ, किसन महादेव आव्हाड, भाऊ आरगडे, बबलू कांबळे, राहुल सानप व अनोळखी पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वाळू चोरांनी थेट अधिकारी महिला व तिचा पती यांना टार्गेट केल्याने जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे.
राहुल गर्जे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, सहायक मोटार वाहन निरीक्षक (RTO) पदावर कार्यरत असलेली पत्नी सोनाली हिने 27 मार्चला बोधेगाव येथे विनानंबरच्या ओव्हरलोड डंपरवर कारवाई केली होती. दुसऱ्या दिवशी शिरसाठ व आव्हाड यांनी आपल्याला आमचे नुकसान झाले असल्याने आम्हाला अडीच लाख रुपये द्या, अशी मागणी केली.
पैसे न दिल्यास त्रास देण्याची तसेच पत्नीची नोकरी घालविण्याची धमकी दिली. त्यानंतर 3 मे रोजी शिरसाठवाडी रोडवर आपल्याला मारहाण करण्यात येऊन पोलिसांत तक्रार केल्यास खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत गावठी पिस्तुलाचा धाक दाखवला, असे गर्जे यांनी फिर्यादीत म्हटले.
12 ऑगस्टला मध्यरात्री कारने घरी जात असताना आपल्याला विनाक्रमांकाच्या वाहनातून आलेल्या आरोपींनी अडवले. धमकी देत आपल्या गळ्यातील दोन तोळ्याचे सोन्याचे लॉकेट हिसकावून घेतले. ही लूट करताना, गावठी पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवला, असेही फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस निरीक्षक आनंद कोकरे आणि सहायक निरीक्षक रोहन खंडागळे तपास करीत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.