Maharashtra Politics : मालेगाव तालुक्यातील गिरणा सहकारी साखर कारखान्याच्या कथित १७८ कोटी रुपयांच्या शेअर घोटाळ्याच्या आरोपांवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत व शिवसेना (शिंदे गट) चे मंत्री दादा भुसे यांच्यात रंगलेला राजकीय वाद अखेर संजय राऊत यांनी दिलगीरी व्यक्त केल्याने मिटला आहे. काल याप्रकरणी मालेगाव कोर्टात सुनावणी होती. खासदार संजय राऊत यांनी केलेले आरोप चुकीच्या माहितीवर आधारित असल्याची कबुली देत न्यायालयात दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दाखल केलेला मानहानीचा फौजदारी खटला मागे घेतला.
हे प्रकरण मिटवण्यासाठी संजय राऊत यांनी दादा भुसे यांची माफी मागितल्याची चर्चा कालपासून राजकीय वर्तुळात सुरु आहे. दरम्यान यावरुन, भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. संजय राऊत हा माफी मागून आनंदी झालेला पहिला माणूस असावा अशी टीका भातळकर यांनी केली. भात राऊत यांच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. राऊत यांनी ही एक्स पोस्ट करुन भातळकर यांना प्रत्युत्तर दिलं.
अतुल जी , माणसाने पाप केले नसेल तर तो नेहमीच आनंदी राहील, आता तुमच्या शंकेचे ऊत्तर असे की, दादाजी भुसे यांच्यावर मूळ आरोप अद्वय हिरे यांचे होते. त्यांनी गिरणा कारखान्यातील व्यवहाराबाबत आधीच खटला दाखल केला आहे. हिरे यांनी आता भाजपात प्रवेश केल्यामुळे हा खटला चालवण्याची जबाबदारी भाजपची आहे. आम्ही का रक्त आटवायचे?आम्ही या खटल्यातून आनंदाने आणि हसत हसत बाहेर पडलो आहोत समजलं? असे प्रत्युत्तर राऊत यांनी एक्स पोस्ट करत दिलं.
दरम्यान राऊत यांच्या या पोस्टला भातखळकर यांनी पुन्हा उत्तर दिलं. संजयजी तुमच्या आयुष्यात आनंद कायम राहो ही शुभेच्छा अगदी मनापासून...असा टोला भातखळकर यांना हाणला. दोघांमधील हे ट्विटरवॉर सुरु असतानाच संजय राऊत यांनी माध्यमांनाही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. राऊत यांनी म्हटले की, मी माफी मागितलेली नाही तर खेद व्यक्त केला आहे. तुम्ही कागद बघू शकता. माफी मागणे व खेद व्यक्त करणे यात फरक आहे असं उत्तर राऊत यांनी भातखळकर यांना दिले.
तो खटला अद्वय हिरे यांचा होता. त्यात मी भाष्य केलं होतं. त्यातून कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त केला. खेद व्यक्त करणे व माफी मागणे दोन्ही भिन्न शब्द आहेत. ज्यांचा हा खटला होता ते अद्वय हिरे हेच आता आमच्यात राहीले नाही, ते भाजप गेले आहेत. त्यामुळे भुसेंचा विषय आता भाजपचा आहे. त्यामुळे यापुढे हा खटला चालवण्याची जबाबदारी अद्वय हिरे यांची आहे. ही माझी भूमिका आहे. यात काय माफी आणि कसलं काय. हा काही माझ्यावरचा पहिला खटला नाही. शेकडो खटले मी लढलो आहे असं संजय राऊत म्हणाले.
नेमकं प्रकरण काय?
‘सामना’मध्ये २२ जून २०२३ ला प्रसिद्ध झालेल्या वृत्तात मंत्री भुसे यांनी गिरणा कारखान्यात १७८ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला होता. भुसे यांनी हे आरोप फेटाळून लावत राऊत यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. मालेगाव कोर्टात याप्रकरणी शनिवार दि. २२ सुनावणी होती. या सुनावणी दरम्यान, शिवसेनेचे (उबाठा) तत्कालीन उपनेते अद्वय हिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार आपण आरोप केले होते. मात्र ती माहिती तथ्यहीन असल्याचे लक्षात आल्याने सर्व आरोप मागे घेत असल्याची व दिलगिरी व्यक्त करीत असल्याची कबुली राऊत यांनी न्यायालयात दिली. यानंतर मंत्री भुसे यांनी मानहानीचा दावा मागे घेतला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.