

Jalgaon Shalarth ID Scam : राज्यभर गाजत असलेल्या १६० कोटींच्या शालार्थ आयडी घोटाळ्यात जळगाव जिल्ह्याचा मोठा सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी एसआयटीने सुमारे ११ हजार पानांचे दोषारोपपत्र नाशिक रोड न्यायालयात सादर केले.
न्यायालयात सादर केलेल्या दोषारोपपत्रात समाविष्ट १११ शिक्षण संस्थांपैकी एकट्या जळगाव जिल्ह्यातील ६६ संस्थांचा समावेश आहे. तसेच या घोटाळ्यातील १,१९९ संशयितांपैकी ८४९ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्थाध्यक्ष आणि सचिव हे जळगाव जिल्ह्यातीलच आहेत. जळगाव जिल्ह्यातील भाजप नेते संजय गरुड हे देखील या रॅकेटमध्ये सापडले आहेत.
या प्रकरणाशी संबंधित १५ जणांचे अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. गुन्ह्यातील संशयित व निवृत्त तत्कालीन शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनीही जामिनासाठी नाशिक रोड न्यायालयात धाव घेतली असून त्यावर आज मंगळवारी सुनावणी आहे. तर, भाजप नेते संजय गरुड हे सिव्हिल हॉस्पिलमध्ये आहेत.
तत्कालीन शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या शालार्थ आदेशांच्या यादीत अमळनेर, चाळीसगाव, जामनेर, भडगाव, पारोळा, रावेर, एरंडोल, भुसावळ, चोपडा यांसह जळगाव जिल्ह्यातील ६६ संस्थांमधील २२८ शिक्षक व कर्मचाऱ्यांचे आदेश काढल्याचे तपासातून समोर आले आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण (फिर्यादी), ठाणे अंमलदार, पंच आणि तपास अधिकारी अशा २७ साक्षीदारांची पडताळणी विवरणपत्रे या दोषारोपपत्रासोबत जोडली आहेत.
या प्रकरणात संशयित आरोपी असलेले सेवानिवृत्त तत्कालीन शिक्षण उपसंचालक नितीन मुरलीधर उपासनी यांच्या कार्यकाळातील स्वाक्षरीच्या याद्या जोडण्यात आल्या आहेत. नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार यां जिल्ह्यांतील संस्थांचा यात समावेश असून, पोलिस प्रशासनाकडून भक्कम पुरावे गोळा करून सर्वांची कसून चौकशी केली जाणार आहे. ‘एसआयटी’ने तपासात वेग घेतला असून या गुन्ह्यांशी संबंधितांविरोधात फास आवळायला सुरुवात केली आहे.
या गुन्ह्यात उत्तर महाराष्ट्रातील २३३ शाळांमधील ८२१ शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक, सचिव आणि शिक्षण विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव व भाऊसाहेब चव्हाण यांच्यासह तब्बल एक हजार १९९ संशयित निष्पन्न झाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.