

Ahilyanagar News : शेवगाव नगरपरिषदेच्या सुमारे दहा लाख रुपये किमतीच्या विद्युत साहित्य पुरवठ्याच्या निविदा प्रक्रियेत गंभीर तांत्रिक त्रुटी असल्याचे निदर्शनास आणून दिल्याचा राग मनात धरून लिपिकास कार्यालयात येऊन मारहाण केल्याचा प्रकार घडला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेविका उज्ज्वला मुंढे यांचे पती नंदकुमार उत्तमराव मुंढे (रा. शेवगाव) यांनी हा प्रकार केला. नगरपरिषदेतील लिपिक केतन वसंत मुरदारे (वय 31, रा. शेवगाव) यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली आहे. नंदकुमार मुंढे हे एकनाथ शिंदे शिवसेनेच्या नगराध्यक्षा माया अरुण मुंढे यांचे दीर आहेत.
फिर्यादीत म्हटले आहे की, नगरपरिषदेने सुमारे दहा लाख रुपये किमतीच्या विद्युत साहित्य खरेदीसाठी निविदा प्रसिद्ध केली होती. या निविदा प्रक्रियेत तीन एजन्सींनी सहभाग घेतला होता. मात्र, तिन्ही निविदांमध्ये गंभीर तांत्रिक त्रुटी आढळून आल्याने संबंधित ठेकेदारांना शासकीय ई-मेलद्वारे याबाबत कळविल्याने ठेकेदार नाराज झाले होते. दरम्यान, 3 नोव्हेंबर रोजी लिपिक मुरदारे नगरपरिषद (Municipal Council) कार्यालयात कामकाज करीत होते.
एकनाथ शिंदे शिवसेनेच्या (Shivsena) नगराध्यक्षा माया मुंढे यांचे पती अरुण मुंढे यांनी त्यांना फोन केला. या फोन संभाषणादरम्यान निविदा प्रकरणावरून जाब विचारत दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात केला. यावेळी नंदकुमार मुंढे यांनीही फोनवरून 'आता तुला मी माझ्यापद्धतीने बघतो,' अशी उघड धमकी दिली. यानंतर नगरपरिषदेच्या पहिल्या मजल्यावरील मीटिंग हॉलमध्ये मुख्याधिकाऱ्यांशी कामकाजाबाबत मुरदरे यांची चर्चा सुरू होती. फोन संपवून मुरदरे तेथून बाहेर पडत असतानाच नंदकुमार मुंढे व त्यांचे दोन साथीदार हॉलमध्ये घुसले.
मुरदरे यांना उद्देशून, तू आमच्या माणसाला जातीवाचक शिवी का दिली? असा जाब विचारत त्यांच्या कानावर जोरदार चापट लगावली. हॉलमध्ये आरडाओरडा ऐकून नगरपरिषदेच्या लेखापरीक्षकांसह अधिकारी व कर्मचारी मदतीसाठी धावून आले. त्यांनी वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतरही नंदकुमार मुंढे यांनी कर्मचाऱ्यांना धमकावत मुरदारे यांना दमदाटी करत कर्मचाऱ्यांसमोर मारहाण केली.
या अचानक घडलेल्या प्रकारामुळे नगरपरिषद कार्यालयातील शासकीय कामकाज पूर्णपणे ठप्प झाले. त्यानंतर मुरदारे व सर्व कर्मचाऱ्यांनी पोलिस ठाणे गाठले. मात्र काहींनी मध्यस्थी करून हे प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्या दिवशी लिपिक केतन मुरदारे यांनी नंदकुमार मुंढे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. उपनिरीक्षक रामहारी खेडकर हे तपास करीत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.