

Nashik Politics : नाशिकमध्ये १९ ऑगस्ट रोजी भाजपची उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागाची महत्वाची संघटनात्मक बैठक पार पडली. भाजपचे सगळे दिग्गज नेते या बैठकीला उपस्थितीत होते. भाजपच्या उत्तर महाराष्ट्रातील घडामोडी पाहाता आता त्यापाठोपाठ शिवसेना देखील अॅक्शन मोडवर आली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची अत्यंत गोपनीय बैठक नुकतीच नाशिकमधील एका हॉटेलमध्ये पार पडली. या बैठकीत पक्षाचे जिल्हाप्रमुख, आमदारांना कोणतेही फोटो अथवा व्हिडिओ काढण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. या बैठकीत पदाधिकाऱ्यांना नेमका काय कानमंत्र देण्यात आला, यासंदर्भात आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.
नाशिकसह जळगाव, धुळे, नंदुरबार व अहिल्यानगर येथील जिल्हाप्रमुख व आमदारांना या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले होते. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी, आमदार सुहास कांदे यांच्या प्रमुख उपस्थितीत तासभर ही बैठक झाली. पक्ष नेतृत्वाने दिलेला संदेश पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी या नेत्यांवर सोपविण्यात आली आहे. त्यादृष्टीने ही बैठक घेण्यात आल्याचे समजले.
बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याची माहिती बाहेर जाऊ नये यासाठी सुरुवातीपासूनच खबरदारी घेण्यात आली होती. कोणत्याही नेत्याला बैठकीदरम्यान फोटो किंवा व्हिडिओ काढण्यास परवानगी नव्हती. तसेच माध्यम प्रतिनिधींनाही बैठकीपासून पूर्णपणे दूर ठेवण्यात आले.
बैठक संपल्यानंतर नेत्यांनी अनौपचारिक चर्चेत संघटनात्मक कामकाजावर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले. आगामी काळात सण-उत्सवांच्या आयोजनात शिवसेनेचे पदाधिकारी सार्वजनिक मंडळांना आवश्यक ते सहकार्य करतील, असेही स्पष्ट करण्यात आले. याशिवाय आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांनी आतापासूनच तयारीला लागावे, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती समोर आली. तर कुणी एसआयआर बाबत मार्गदर्शन करण्यात आल्याचे सांगितले.
मात्र, बैठकीतील मुख्य विषय व चर्चा वेगळीच असल्याची चर्चा असून त्याविषयी कमालीची गोपनीयता पाळली जात आहे. बैठकीच्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांव्यतिरिक्त कुणालाही प्रवेश मिळणार नाही, याचे काटेकोर नियोजन केले होते. त्यामुळे जिल्हाप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांना प्रवेशाची परवानगी मिळेपर्यंत हॉलच्या बाहेर उभे राहावे लागले. यात उच्चस्तरीय पदाधिकाऱ्यांचाही समावेश होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.