FDA News: राज्यभर अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईची चर्चा आहे. मात्र या विभागाने सिन्नर मध्ये दूध भेसळी विरोधात केलेली कारवाई वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. याबाबत पोलिसांनीही वेगळाच संशय व्यक्त केला आहे.
गेल्या आठवड्यात अन्न व औषध प्रशासनाने शहा, रामपूर यांसह सिन्नर तालुक्यातील चार दूध संघांवर छापा टाकला. दिवसभर याबाबत कारवाई सुरू होती. दूध भेसळीचे 17 लाखांचे साहित्य जप्त करण्यात आले.
याबाबत सिन्नर पोलीस ठाण्यात अन्न व औषध प्रशासनाने प्रशांत रोहिदास काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून प्रशासनाने पोलिसांना कोणतेही सहकार्य केले नाही. माहितीसाठी केलेल्या संपर्काला प्रतिसाद दिलेला नाही.
गुन्हा दाखल झालेला संशयित काळे हा प्रत्यक्षात वाहन चालक असल्याचे बोलले जाते. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाच्या कारवाईदरम्यान दूध भेसळ पावडर विक्रेता असलेला पवार हा सूत्रधार पथकासोबत फिरत होता. कर्मचाऱ्यांशी त्याचा चांगला संवादही सुरू होता.
गुन्हा दाखल होताच पवार आणि काळे दोघेही बेपत्ता झाले आहेत. अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईत मुख्य सूत्रधाराला वाचविले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यातील सूत्रधार असलेल्या पवार हा कोपरगाव, निफाड आणि सिन्नर तालुक्यातील दूध संघांना भेसळीचे साहित्य पुरवतो, असे समजते. यापूर्वी त्याच्या विरोधात वावी, निफाड आणि अन्यत्र गुन्हे दाखल आहेत.
सिन्नर तालुक्यात यापूर्वीही राजरोस दुधात भेसळ सुरू होती. त्याचा संबंध थेट सिन्नरच्या राजकीय नेत्यांची जोडला जातो. दूध संकलन केंद्र आणि सहकारी संस्था चालविणाऱ्या संचालकांची अल्पावधीत झालेली भरभराट देखील चर्चेत आहे.
सिन्नर तालुक्यातील दूध भेसळीच्या मुख्य सूत्रधारा विषयी यापूर्वीही अनेकदा अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या. या कारवाईनंतर ठोस कारवाई व्हावी म्हणून पाठपुरावा करणारे भाऊसाहेब बैरागी यांनी थेट राज्याच्या आयुक्तांकडे सविस्तर व लिखित तक्रार केली आहे. मात्र अद्यापही सिन्नरच्या दूध भेसळीचा सूत्रधार बेपत्ता आहे.
कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांसोबत असलेला सूत्रधार त्यामुळेच चर्चेचा विषय आहे. राज्यभर चर्चेत असली तरी सिन्नर मधील अन्न व औषध प्रशासनाची कारवाई आता वादात सापडली आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांकडे पोलिसांनी बोट दाखविले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.