

Nashik FDA News : गणेशोत्सव आणि आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांतील भेसळीला आळा घालण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासनाने धडक मोहिम हाती घेतली आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी कारभार हाती घेतल्यापासून राज्यभर भेसळखोरांविरोधात कारवाई सुरू आहे. सणासुदीच्या काळात मिठाई, दुग्धजन्य पदार्थ, मसाले आणि खाद्यतेलाची मागणी वाढते. त्यामुळे एफडीए कडून विशेष तपासणी मोहिम राबवली जात आहे. त्यासाठी तुकाराम मुंढे यांच्यासह नाशिक विभागाचे अन्न व औषध प्रशासन सहआयुक्त मंगेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील चारही जिल्ह्यांत विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.
या मोहिमेअंतर्गत गेल्या दहा दिवसांत नाशिक, अहिल्यानगर, जळगाव आणि धुळे जिल्ह्यांत तब्बल ३६ ठिकाणी कारवाया करण्यात आल्या. त्यातून तब्बल ५ कोटी ४० लाख १६ हजार ६२१ रुपयांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे.
यात सर्वात मोठी कारवाई अहिल्यानगरमध्ये करण्यात आली आहे. अहिल्यानगर येथील अरिहंत कोल्ड स्टोरेजवर केलेल्या कारवाईत ३ कोटी ९५ लाख ६२ हजार रुपये किमतीचे ७५ हजार ३५६ किलो पाश्चराइज्ड कुकिंग बटर जप्त करण्यात आले. या साठ्याची गुणवत्ता आणि सुरक्षिततेबाबत संशय असल्याने नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
नाशिकच्या द्वारका सर्कल परिसरात ११ सप्टेंबर रोजी पहाटे दोन खासगी प्रवासी बसची तपासणी करण्यात आली. या वेळी अवैधरीत्या वाहतूक केला जाणारा ५ लाख ५८ हजार रुपये किमतीचा दोन हजार १५५ किलो बर्फीचा साठा आढळून आला. हा साठा जप्त करण्यात आला.
निफाड तालुक्यातील कोकणगाव येथील आर्या शीतगृहामधून ३९ लाख १८ हजार रुपये किमतीचा सीताफळ व आंब्याचा गर तसेच क्रीमचा ६ हजार ४५७ किलो साठा जप्त करण्यात आला.
जळगाव, धुळे जिल्ह्यातही कारवाई करण्यात आली. पाचोरा येथील ‘न्यू वाघ मिल्क डेअरी’मधून तीन लाख ४० हजार रुपयांचे तूप व क्रीम जप्त करण्यात आले. धुळे शहरातील साक्री रोडवरील गायत्री ट्रेडर्समधून ३ लाख एक हजार रुपयांचे गायीचे व म्हशीचे संशयास्पद तूप जप्त करण्यात आले.
याशिवाय नाशिक विभागात इतर विविध ठिकाणी पथकाने कारवाई केली. ज्यामध्ये,नाशिक शहरातील रविवार कारंजा आणि पंचवटी भागातील विजया एंटरप्रायजेस व प्रकाश एंटरप्रायजेस येथून अडीच लाख रुपयांचे वनस्पती तूप आणि सोयाबीन तेल जप्त करण्यात आले.
अहिल्यानगर मधील सावेडी येथील ‘रुचीराज स्वीट्स’मधून दोन लाख २२ हजार रुपयांचे तूप, तर श्रीरामपूर येथून दोन लाख रुपयांचे गायीचे तूप जप्त करण्यात आले. जळगावच्या इच्छादेवी चौकातून एक लाख ६६ हजार रुपयांची अनधिकृत चंदन स्वीट सुपारी जप्त करण्यात आली. तर, संगमनेर येथून एक लाख रुपयांचे पामोलीन तेल, तर चोपडा येथे हलवा-बर्फीचा साठा जप्त करण्यात आला. नाशिक शहरात गूळ, वेलची आणि तुपाचेही संशयास्पद साठे आढळून आले असून ते जप्त करण्यात आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.