
Nirmala Gavit news: आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उपनेत्या निर्मला गावित यांनी बुधवारी शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विविध नेत्यांसमवेत त्यांचे स्वागत केले. गावित यांच्या पक्षप्रवेशाने शिवसेना शिंदे पक्ष अधिक मजबूत झाला आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना (Shivsena) उद्धव ठाकरे पक्षाच्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केला आहे. दोन दिवसांपूर्वीच नाशिकचे माजी आमदार नरेंद्र दराडे यांनी देखील पक्षाला जय महाराष्ट्र केला होता. नाशिकसह उत्तर महाराष्ट्र उद्धव ठाकरे समर्थकांना गळती लागली आहे.
ठाणे येथे माजी आमदार निर्मला रमेश गावित यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह शिवसेना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पक्षात प्रवेश केला. या प्रसंगी परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक, शिवसेना सचिव राम रेपाळे, शिवसेना उपनेते, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, शिवसेना प्रणित शिक्षक सेनेचे राज्य प्रमुख आमदार किशोर दराडे, आमदार नरेंद्र दराडे, माजी खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार पांडुरंग गांगड, जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, संपत काळे, सुरेश गंगापुत्र, सनी मेढे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
इगतपुरी, त्र्यंबकेश्वर येथील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. निवडणुकीत हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडे होता. यामध्ये गावित या काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षाच्या अंतर्गत राजकारणाच्या बळी ठरल्या होत्या.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीत राज्यात शिवसेनेचा भगवा फडकेल. त्या दृष्टीने सगळीकडे वातावरण आहे. महायुती म्हणून निवडणुकीची तयारी करणार आहोत, मात्र गरज पडल्यास शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष सक्षमपणे अन्य पर्याय यांचा देखील विचार करेल, असे शिंदे म्हणाले.
राज्य शासनाने जनतेच्या हितासाठी विविध योजना राबविल्या आहेत. यामध्ये लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ, लाडक्या शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या योजना कदापि बंद होणार नाहीत. विधानसभा निवडणुकीत महायुतीने दिलेली आश्वासने टप्प्याटप्याने पूर्ण करणार आहोत, अशी ग्वाही याप्रसंगी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे, गाव तिथे शिवसेना आणि घर तिथे शिवसैनिक याप्रमाणे काम करण्याचे आवाहन नाशिकमधील पदाधिकाऱ्यांना केले. तसेच शालेय पोषण आहार योजनेसाठी काम करणाऱ्या महिलांचा मानधनवाढीचा विषयाबाबत शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्याशी बोलून सकारात्मक मार्ग काढू, असे आश्वस्त त्यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.