Mumbai News : आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा फड रंगणार आहे. सुप्रीम कोर्टाने येत्या चार महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश दिल्याने आता सर्वच राजकीय पक्षांची लगीनघाई सुरु आहे. एकीकडे उद्धव व राज ठाकरे एकत्र येतील, अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले असताना आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली असल्याची समजते. त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे आता अधिकच रंगतदार ठरणार आहेत. विशेषतः शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चार महिन्यापूर्वी पीएम नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मुंबईत आल्यानंतर महायुतीमधील भाजपसह मित्र पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थेसह सर्वच निवडणुका एकत्र लढण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे महायुती एकत्रीत निवडणुका लढवेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, गेल्या काही दिवसापासूनच्या भाजपमधील हालचाली पहिल्या तर वेगळेच संकेत मिळत आहेत. विशेषतः केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या तीन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यानंतर भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा पर्याय तपासायला सुरुवात केल्याची चर्चा आहे.
येत्या काळात विशेषतः मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूरसारख्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या हालचाली महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. भाजपचा हा निर्णय म्हणजे आगामी निवडणुकांमध्ये स्वबळावर आपली ताकद आजमावण्याचा प्रयत्न आहे. यामागे विविध राजकीय गणिते कार्यरत आहेत.
राज्यात महायुतीमध्ये भाजपसोबतच एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये जागा वाटप, स्थानिक पातळीवरील मतभेद आणि कार्यकर्त्यांमधील असंतोष लक्षात घेता, या दोन्ही गटांची भूमिका ठराविक ठिकाणी वेगळी असू शकते. त्यामुळेच भाजपने येत्या काळात आपली शक्ती अजमाविण्यास सुरुवात केली आहे.
भाजपने येत्या काळात स्वबळाची तयारी केली आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यातली आपली संघटनशक्ती आणि मतदारांवरील प्रभाव याची चाचपणी करण्याची शक्यता आहे. त्यासोबतच महायुतीतील भागीदार असलेल्या शिंदे गट व अजित पवार गटाच्या तुलनेत चाचपणीही सुरु केली आहे. त्यामुळे मित्रपक्षाशिवाय स्थानिकच्या निवडणुका लढताना काय परिणाम होऊ शकतो, याचा अंदाज बांधला जात आहे.
स्थानिक पातळीवरील संघटन बळकट करण्यास भाजपने गेल्या काही दिवसापासून सुरुवात केली आहे. विशेषतः स्थानिक पातळीवर कार्यकर्ते, नगरसेवक यांचं नेटवर्क मजबूत केले आहे. त्यासोबतच बूथ लेव्हलला कार्यकर्त्याचे जाळे निर्माण केले आहे. त्याचा थेट फायदा भाजपला होणार आहे. भाजपने मतदारांमध्ये थेट संपर्क वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे स्वबळावर निवडणूक लढल्यास मतदारांपर्यंत भाजपचा संदेश थेट पोहोचवता येणार आहे. 2024 लोकसभा, विधानसभा निवडणुकांनंतर मिळालेल्या यशामुळे आत्मविश्वास वाढला आहे. केंद्रात आणि काही राज्यांत पुन्हा सत्तेत आल्यामुळे भाजप स्वबळावर ताकदीने निवडणूक लढण्याचा विचार करत आहे.
भाजपने (BJP) स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी केली असेल तर याचा मोठा फटका एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बसणार आहे. यामुळे राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीमध्ये तणाव येण्याची शक्यता आहे. भाजपने जर स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला, तर एकनाथ शिंदे गट व अजित पवार यांच्या भाजपसोबतच्या महायुतीत तणाव निर्माण होऊ शकतो. त्यासोबतच महायुतीमधील मताची मोठ्या प्रमाणात विभागणी होणार असल्याने मोठा तोटा तीन पक्षांना सहन करावा लागणार आहे.
त्यासोबतच भाजपच्या स्वबळावर निवडणूक लढण्याचा फायदा विरोधकांना होऊ शकतो. महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट)) एकत्र राहण्याचा फायदा त्यांना मिळू शकतो. त्यासोबतच भाजपपुढे मतविभागणीचा धोका असणार आहे. काही ठिकाणी भाजपच्या उमेदवारांमुळे मित्रपक्षांचे मतविभागणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपच्या या निर्णयाचा एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे.
स्थानिकच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा अंतिम निर्णय भाजपचे राष्ट्रीय नेतृत्व आणि राज्यस्तरीय समन्वय समिती घेणार आहे. हे सर्व समीकरणे सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार बदलणारे असणार आहे. त्यामुळे सर्वांचेच त्याकडे लक्ष असणार आहे.
आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्यातील राजकीय समीकरणांना नव्याने आकार देणाऱ्या ठरणार आहेत, आणि या निवडणुकांमधून पुढील विधानसभेची दिशा ठरू शकते. त्यामुळे या निवडणुकांमध्ये काय होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील लोकसभा व विधानसभा एकत्रित लढणारी महायुती आगामी काळात काय निर्णय घेणार? यावर बरीच समीकरणे अवलंबुन असणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.