

Shiv Sena Political Crisis : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून सहा खासदारांनी बंडखोरी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता पक्षाला आणखी एक मोठा राजकीय धक्का बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
या सहा खासदारांमध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचाही समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे यांचा शिर्डी दौरा होत असताना, त्यांच्या अत्यंत विश्वासू मानल्या जाणाऱ्या नेत्याने साथ सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक आणि माजी जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी स्वतःच पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे. राजकीय वर्तुळात आता खेवरे लवकरच एकनाथ शिंदे शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिर्डी सभेपूर्वीच हा मोठा धक्का मानला जात आहे.
महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सतत राजकीय धक्के बसत आहेत. सर्वप्रथम एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोठी बंडखोरी झाली आणि त्यानंतर पक्ष संघटनाही मोठ्या प्रमाणावर हादरली. आता लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे शिवसेनेतील सहा खासदारांनीही वेगळी भूमिका घेतल्याने पक्षाची अडचण वाढली आहे. या सर्व घडामोडींमध्ये एकनाथ शिंदे सातत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर राजकीय दबाव वाढवत असल्याचे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सध्या बंडखोरी केलेल्या खासदारांच्या मतदारसंघांमध्ये सभा घेत पक्ष संघटना सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र शिर्डीतील सभेपूर्वीच रावसाहेब खेवरे यांनी वेगळा निर्णय घेण्याचे संकेत दिल्याने राजकीय वातावरण तापले आहे. विशेष म्हणजे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे लोकसभा निवडणूक लढवत असताना त्यांच्या विजयामध्ये रावसाहेब खेवरे यांची महत्त्वाची भूमिका मानली जात होती. मात्र गेल्या काही महिन्यांपासून ते पक्षातील घडामोडींवर नाराज असल्याचे बोलले जात होते. विशेषतः राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या काळात त्यांनी उमेदवारीसाठी थेट ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.
त्या भेटीनंतर पक्षाकडून उमेदवारी मिळणार असल्याचा दावा रावसाहेब खेवरे यांनी केला होता. मात्र राहुरी विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष यांच्या वाट्याला गेल्यानंतर समीकरण बदलले. अखेर या जागेवर वेगळे राजकीय निर्णय झाले आणि खेवरे यांची नाराजी अधिक वाढल्याचे सांगितले जाते.
रावसाहेब खेवरे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. मात्र या पोटनिवडणुकीत त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. पक्षाने संधी न दिल्याची सल त्यांच्या मनात कायम राहिली आणि तेव्हापासूनच ते पक्ष नेतृत्वापासून दूर गेल्याचे बोलले जात आहे. विशेष बाब म्हणजे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली तेव्हाही रावसाहेब खेवरे यांनी कोणतीही सार्वजनिक प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यामुळे त्यांच्या स्वतंत्र राजकीय हालचाली सुरू असल्याची चर्चा आधीपासून होती.
आता उद्धव ठाकरे शिर्डीत सभा घेत असतानाच रावसाहेब खेवरे यांनी अचूक टायमिंग साधत वेगळा निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे शिर्डी दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा राजकीय धक्का बसणार का? याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायमिंग’ची ही नवी खेळी ठरणार का? याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.