

Nashik News : शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, विसापूर, ता. कळवण येथील विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढविण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गावागावात जाऊन विद्यार्थ्यांच्या घरी प्रत्यक्ष भेटी देत समुपदेशन सुरू केले आहे.
विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याबाबत पालकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होत असून, अनेक पालकांनी आपल्या पाल्यांना आजपासूनच शाळेत पाठविण्याची तयारी दर्शविली आहे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळवणचे सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी डॉ. काश्मिरा संखे यांच्या आदेशान्वये हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शिक्षक व कर्मचाऱ्यांकडून विद्यार्थ्यांच्या पालकांची प्रत्यक्ष भेट घेऊन शिक्षणाचे महत्त्व, आश्रमशाळेत उपलब्ध असलेल्या शैक्षणिक व निवासी सुविधांची माहिती तसेच विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी नियमित शाळेत उपस्थित राहण्याचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे.
यावेळी पालकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या जात असून, विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटीमुळे अनेक पालकांनी सकारात्मक प्रतिसाद देत आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्याची तयारी दर्शविली आहे.
शाळेतील शिक्षक व कर्मचारी ‘विद्यार्थी हेच केंद्रबिंदू’ मानून विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होऊ नये, त्यांची शैक्षणिक प्रगती सुरू राहावी आणि आश्रमशाळेवरील पालकांचा विश्वास अधिक दृढ व्हावा, यासाठी प्रयत्नशील आहेत. गावागावात जाऊन पालकांशी थेट संवाद साधल्यामुळे विद्यार्थी उपस्थिती वाढण्यास मदत होणार असून, पालक-शाळा यांच्यातील संवादही अधिक मजबूत होणार आहे.
पालकांचा सकारात्मक प्रतिसाद
शिक्षक व कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन केलेल्या समुपदेशनानंतर “आम्ही आमच्या मुलांना शाळेत पाठवू,” अशी भूमिका अनेक पालकांनी व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांना आजपासूनच शाळेत पाठविण्याची तयारी पालकांनी दर्शविली आहे. शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, विसापूर येथील शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या या उपक्रमाचे परिसरातील पालकांकडून कौतुक होत असल्याचेही प्रकल्पाधिकारी श्रीमती डाॅ. संखे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.