Seva Sankalp Abhiyan : नाशिकचे जिल्हाधिकारी थेट कोडीपाड्यात; काय आहे 'सेवा संकल्प अभियान'? ज्यातून प्रत्येक गावात पोहोचणार प्रशासन

Nashik Collector Ayush Prasad Visits Kodipada in Surgana : नाशिक जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यास सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद स्वत: त्यासाठी मैदानात उतरले आहेत.
Nashik Collector Ayush Prasad Visits Kodipada in Surgana
Nashik Collector Ayush Prasad Visits Kodipada in SurganaSarkarnama
Published on
Updated on

Seva Sankalp Abhiyan in Nashik : शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना व शासकीय सेवा पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी नाशिक जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियान’प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. स्वत: जिल्हाधिकारी आयुष प्रसाद त्यासाठी मैदानात उतरले असून गावांना भेटी देत आहेत.

या अभियाना अंतर्गत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शनिवारी (दि.१९) सुरगाणा तालुक्यातील निसर्गरम्य कोडीपाडा या गावाला भेट दिली. त्यांनी सकाळी आदिवासी बांधवांशी संवाद साधला. यावेळी तहसीलदार रामजी राठोड उपस्थित होते. जिल्हाधिकारी प्रसाद यांचे आदिवासी बांधवांनी पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत विविध शासकीय योजना, सेवा आणि स्थानिक प्रश्नांची माहिती घेतली.

गावातील प्रत्येक नागरिकाकडे आधारकार्ड, रेशनकार्ड तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे उपलब्ध आहेत किंवा नाहीत, याची माहिती घ्यावी. ज्या नागरिकांकडे आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नाहीत, त्यांना ती मिळवून देण्यासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधून कार्यवाही करावी. कागदपत्रे किंवा माहितीच्या अभावामुळे कोणताही नागरिक शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

Nashik Collector Ayush Prasad Visits Kodipada in Surgana
Nashik Politics : दादा भुसेंच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षकांचा गौरव ; निमंत्रण देऊनही भाजप-राष्ट्रवादीचे प्रमुख नेते का आले नाही?

काय आहे हे अभियान?

महसूल विभागाच्या शासन आदेशानुसार नाशिक जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत असून, या अभियानाच्या माध्यमातून प्रशासन थेट नागरिकांपर्यंत पोहोचणार आहे.

समाजातील वंचित, दुर्बल आणि पात्र घटकांचा शोध घेऊन त्यांना शासनाच्या विविध योजना, सेवा व सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्ह्यात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत. एकही पात्र नागरिक शासकीय सेवांपासून वंचित राहू नये, यासाठी प्रत्येक गावात विशेष उपक्रम व शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली एक महिनाभर या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. अभियानासाठी जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात आली असून, विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

‘रस्ते अदालत’मधून स्थानिक प्रश्नांवर कार्यवाही

सेवा संकल्प अभियानांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीत ‘रस्ते अदालत’ आयोजित करण्यात येणार आहे. स्थानिक रस्त्यांशी संबंधित समस्या, प्रलंबित कामे व नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री पाणंद रस्त्यांची माहिती नागरिकांना मिळावी यासाठी संबंधित ठिकाणी फलक लावण्यात येणार आहेत.

वंचित लाभार्थ्यांचा शोध घेऊन योजनांचा लाभ

निराधार योजनेपासून वंचित असलेल्या पात्र लाभार्थ्यांचा शोध घेऊन त्यांचा योजनांमध्ये समावेश करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. विविध सात प्रकारच्या आजारांनी बाधित पात्र नागरिकांचा योजनांमध्ये नियमानुसार समावेश करण्यासोबतच मृत व्यक्तींची नावे लाभार्थी यादीतून वगळणे, दिव्यांग व अन्य वंचित घटकांचा पात्रतेनुसार समावेश करण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार आहे.

वन हक्क दावे, क्षेत्र दुरुस्ती तसेच घरकुलासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याबाबतही विशेष कार्यवाही केली जाणार आहे. गावातील कचऱ्याचे ब्लॅक स्पॉट निश्चित करून तेथे स्वच्छता व सौंदर्यीकरण करण्यात येणार असून, जलस्रोतांची स्वच्छता करण्यावरही भर देण्यात येणार आहे.

Nashik Collector Ayush Prasad Visits Kodipada in Surgana
Nashik News : निधी वेळेत खर्च करा, नाहीतर विभागप्रमुखांवर जबाबदारी निश्चित करणार; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे निर्देश

स्वच्छता कामगार, वीरमाता-वीरपित्यांशी संवाद

अभियानांतर्गत स्वच्छता कामगारांसमवेत संवाद साधून त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेण्यात येणार आहेत. प्रशासनातील अधिकारी शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. तसेच देशासाठी योगदान देणाऱ्या वीरमाता व वीरपित्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्यात येणार आहे.

रोजगार, करिअर मार्गदर्शन व अवयवदानासाठी उपक्रम

युवकांसाठी रोजगार मेळावे व करिअर मार्गदर्शन मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. अवयवदानाबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रत्येक गावात आवश्यकतेनुसार विविध शासकीय सेवा व दाखले उपलब्ध करून देण्यासाठी शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. तसेच दोन ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ग्रामसभेत सेवा संकल्प अभियानाची माहिती देण्यात येणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com