
Nagpur, 18 March : नागपूरच्या हिंसाचारात तीन डीसीपींसह एकूण 33 पोलिस जखमी झाले आहेत. एका डीपीसीवर तर थेट कुऱ्हाडीने वार करण्यात आलेला आहे, त्यामुळे पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला, त्यांना काहीही झालं तरी सोडणार नाही. पोलिस शांतता प्रस्थापित करत होते, अशावेळी त्यांच्यावर केलेला हल्ला अत्यंत चुकीचा आहे. पोलिसांवरील हल्ला कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नागपुरातील हिंसाचारावर आज (ता. 18 मार्च) विधानसभेत निवेदन केले. त्यात त्यांनी पोलिसांवरील हल्ल्यासंदर्भात कडक भूमिका घेतल्याचे दिसून आले. ते म्हणाले, नागपूरच्या घटनेत काही लोकांचा सुनियोजित पॅटर्न दिसतो आहे. अशा लेाकांवर कारवाई केलीच जाईल. कोणालाही कायदा हातात घेतला जाऊ देणार नाही. शांतता प्रस्थापित करणाऱ्यांवर पोलिसांवरील हल्ला खपवून घेणार नाही.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंजेबाची कबर हटविण्यासाठी नागपुरात (Nagpur) आंदोलन केले. हे आंदोलन करताना त्यांनी गवताच्या पेंड्या असलेली प्रतिकात्मक कबर जाळली हेाती. त्यानंतर गणेश पेठ पोलिसांनी दुपारी तीनच्या सुमारास गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सायंकाळी अफवा पसविण्यात आली की, प्रतिकात्मक कबर जाळण्यात आली, त्यावर धार्मिक मजकूर होता. सायंकाळी नमाजानंतर दोनशे ते तीनशे नागरिकांचा जमाव जमा झाला आणि नारे देऊ लागला. याच लोकांनी आग लावून टाकू, असे हिंसक बोलणे सुरू केल्याने पोलिसांनी बळाचा वापर केला.
दरम्यान, यापूर्वी बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या विरोधात तक्रार द्यायची आहे; म्हणून गणेश पेठ पेालिस ठाण्यात तक्रार ऐकून घेण्यात आली. एकीकडे पोलिस तक्रार ऐकून घेत असताना दुसरीकडे हंसापुरी भागात दोनशे ते तीनशे लोक हातात काठ्या घेऊन दगडफेक करू लागले. दगडफेक करणाऱ्यांच्या तोंडावर फडके बांधण्यात आले होते. या घटनेत बारा दुचाकींचे नुकसान झाले आहे. या घटनेत घातक शस्त्राने काही लेाकांवर हल्ला करण्यात आलेला आहे, असेही फडणवीसांनी स्पष्ट केले.
फडणवीस म्हणाले, तिसरी घटना भालदारपुरा भागात साडेसात वाजता घडली. सुमारे ८० ते १०० लोकांचा जमाव त्या ठिकाणी हेाता. त्या ठिकाणी त्यांनी पोलिसांवर हल्ला केला. त्या वेळी पोलिसांना आश्रुधूर आणि सौम्य बळाचा वापर करावा लागला. त्या घटनेत एक क्रेन, दोन जेसीबी काही चारकीवाहने जाळण्यात आली आहेत.
या संपूर्ण घटनेत एकूण 33 पोलिस जखमी झाले आहेत, त्यात तीन उपायुक्त दर्जाचे पोलिस अधिकारी असून त्यातील एकावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात एकूण पाच नागरिक जखमी झाले आहेत, त्यातील तिघांना उपचार करून घरी सोडले आहे, तर एक अतिदक्षता विभागात आहे. गणेशपेठ पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले असून तहसील पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अकरा पोलिस ठाण्याच्या हइद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, नागपुरात एसआरपीच्या पाच तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत. राज्यातील सर्व सीपी आणि एसपींची पोलिस महासंचालकांनी बैठक घेऊन शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठीची सूचना केलल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.