Diwali Aid : सरकारने दिलेला शब्द पाळलाच नाही: भाजपने दाखवला ८२ हजार शेतकऱ्यांना ठेंगार; ५ हजारांच्या मदतीपासून वंचित

Shivsena UBT Nitin Deshmukh Warns of Farmer Protest Over Diwali Aid : कोरड्या दुष्काळामुळे विदर्भातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजार रुपये अग्रीम रक्कम देऊन त्यांची दिवाळी गोड करणार, असे आश्वासन राज्य सरकारने दिले होते.
Farmer Diwali Aid
Farmer Diwali AidAI Photo
Published on: 
Updated on: 

Akola News : विदर्भातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचे आश्वासन देणाऱ्या राज्य सरकारवर आता विरोधकांनी जोरदार निशाणा साधला आहे. अकोला जिल्ह्यातील तब्बल ८२ हजार पात्र शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी जाहीर केलेली ५ हजार रुपयांची अग्रीम मदत अद्याप मिळाली नसल्याचा आरोप उद्धवसेनेचे उपनेते तथा आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे. हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर विदर्भातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात शेतकऱ्यांसाठी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

अकोल्यातील ८२ हजार शेतकरी मदतीपासून वंचित

कोरड्या दुष्काळामुळे विदर्भातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजार रुपयांची अग्रीम मदत देऊन त्यांची दिवाळी गोड करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. मात्र, अकोला जिल्ह्यातील ३ लाख ६ हजार पात्र शेतकऱ्यांपैकी तब्बल ८२ हजार शेतकऱ्यांना अद्याप ही मदत मिळालेली नाही, असा दावा आमदार नितीन देशमुख यांनी केला.

या मुद्द्यावरून त्यांनी भाजप सरकारला धारेवर धरले. पाच हजार रुपयांत भाजपच्या स्थानिक खासदार आणि आमदारांची दिवाळी साजरी झाली का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन देऊन प्रत्यक्षात त्यांना प्रतीक्षेत ठेवले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. राज्य सरकार आणि सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधींचे शेतकऱ्यांप्रती असलेले धोरण आणि हेतू प्रामाणिक नसल्याची टीका देशमुख यांनी केली.

Farmer Diwali Aid
Shivsena UBT : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चा सुरु असतानाच उद्धव ठाकरेंचे विभागप्रमुखांना मातोश्रीवर आमंत्रण, नेमकं कारण काय?

या पत्रकार परिषदेला जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, जिल्हाप्रमुख मुकेश मुरूमकार, उपजिल्हाप्रमुख योगेश्वर वानखडे, सुरेंद्र विसपुते, निवासी उपजिल्हाप्रमुख अतुल पवनीकर, जिल्हासंघटक भूषण भिरड, शहरप्रमुख आशिष गावंडे (अकोला पश्चिम), शहरप्रमुख राहुल कराळे (अकोला पूर्व), युवासेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक अभय खुमकर, तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर म्हैसने, संजय भांबेरे, किरण अवताडे आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांसाठी मतदारसंघनिहाय आंदोलन छेडणार

विदर्भातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने सरसकट एक लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आमदार नितीन देशमुख यांनी केली. ही मागणी मान्य न झाल्यास हिवाळी अधिवेशनानंतर विदर्भातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात शेतकरी आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. या आंदोलनांतर्गत संबंधित मतदारसंघातील उपविभागीय अधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आगामी काळात शेतकरी मदतीचा मुद्दा विदर्भात आणखी तापण्याची शक्यता आहे.

चार महिन्यांत अकोला जिल्ह्यात ६४ शेतकरी आत्महत्या

कोरड्या दुष्काळाच्या तीव्रतेमुळे शेतकरी हतबल झाले असून, मागील चार महिन्यांत अकोला जिल्ह्यातील ६४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा आमदार नितीन देशमुख यांनी केला. तर राज्यात मागील नऊ महिन्यांत २२२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचेही त्यांनी सांगितले. शेतकरी आत्महत्यांची वाढती संख्या पाहता राज्य सरकारचे शेतकरीविषयक धोरण अपयशी ठरल्याची टीका त्यांनी केली. शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी सरकारकडून केवळ आश्वासने दिली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

मंत्र्यांची आश्वासने हवेतच; भाजपच्या स्थानिक नेत्यांचे मौन

२० सप्टेंबर रोजी अकोल्यात आलेले कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, २३ सप्टेंबर रोजी बाळापूर तालुक्यात शेताची पाहणी करण्यासाठी आलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ३० सप्टेंबर रोजी अकोल्यात आलेले महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना अग्रीम मदत देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ही आश्वासने प्रत्यक्षात पूर्ण झाली नसल्याचा आरोप नितीन देशमुख यांनी केला. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांना मदत न मिळाल्याच्या मुद्द्यावर भाजपच्या स्थानिक खासदार आणि आमदारांनी मौन बाळगल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याचेही त्यांनी सांगितले.

Farmer Diwali Aid
Shivsena UBT : कर्जत प्रकल्पावरून संघर्ष तीव्र; प्रकल्पासाठी होणारी वृक्षतोड ठाकरेंच्या शिवसेनेनं बंद पाडली, वनखात्यानेही दिलं स्पष्टीकरण

महापालिकेतील भ्रष्टाचार उघड करणार

दरम्यान, अकोला महापालिकेतील कथित भ्रष्टाचाराचाही मुद्दा आमदार नितीन देशमुख यांनी उपस्थित केला. भाजपच्या काही लोकप्रतिनिधींसाठी महापालिका भ्रष्टाचाराचे कुरण बनल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. प्रशासनावर दबावतंत्राचा वापर करून कोट्यवधी रुपयांच्या योजनांमध्ये खुलेआम भ्रष्टाचार केला जात असल्याचा दावा त्यांनी केला. महापालिकेतील अशा अनेक प्रकरणांचा लवकरच पर्दाफाश करणार असल्याचा इशाराही आमदार देशमुख यांनी दिला. त्यामुळे शेतकरी मदतीच्या मुद्द्यासोबतच अकोला महापालिकेतील कथित भ्रष्टाचारावरूनही राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.