Mahayuti Nagpur News : भाजपने नागपूरमधील सर्व सहा विधानसभा मतदारसंघावर दावा केला असल्याने महायुतीमध्ये चांगली अस्वस्थता निर्माण झाली आहे. खासकरून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी भाजपच्या दाव्यावर चांगलेच संतापले आहेत. आम्ही कमळाचे काम करायला तयार आहे मात्र भाजपने आधी महायुतीचा धर्म पाळावा आणि पक्षासाठी सन्माजनक जागा शहरात आणि ग्रामीणमध्ये सोडाव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे.
भाजपचे(BJP) शहर अध्यक्ष बंटी कुकडे यांनी नागपूर शहरातील सर्व सहा जागांवर भाजपचे उमेदवार उभे राहणार असल्याचे जाहीरपणे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी कमळाचे काम करावे असेही आवाहन त्यांनी केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी वर्तविली आहे. बंटी कुकडे यांना जागा वाटपाचा अधिकार भाजपने दिला नाही. कोणाशीही चर्चा न करता परस्पर जागा जाहीर करण्याचा निर्णय त्यांना कोणी दिला? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे शहाराध्यक्ष प्रशांत पवार यांनी उपस्थित केला.
लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही भाजपचे उमेदवार केंद्रीयमंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांचा प्रामाणिक प्रचार केला. त्या बदल्यात कुठलीही अपेक्षा केली नाही. ज्या सभेला, यात्रेला बोलावले त्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला होता. त्यांच्या विजयाच्या वाट्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे.
भाजपचे नेते तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(Amit Shah) यांनी विधानसभेची निवडणूक महायुती एकत्रित लढणार असल्याचे जाहीर केले आहे. ज्या मतदारसंघात भाजपचा आमदार आहे त्या जागा आम्ही मागितलेल्या नाहीत. महायुतीच्या विरोधकाकडे असल्याला जागेची मागणी करीत आहोत. ग्रामीणमधील काटोल आणि शहरातील पश्चिम आणि उत्तर नागपूर विधानसभेची मागणी राष्ट्रवादीने महायुतीच्या नेत्यांकडे केली आहे.
जो मतदारसंघ जिंकू शकत नाही त्याच जागेवर राष्ट्रवादीने दावा केला आहे. असे असताना भाजपच्या स्थानिक नेत्यांनी परस्पर विधाने करून महायुतीच मिठाचा खडा टाकू नये असेही राष्ट्रवादीचे शहाराध्यक्ष प्रशांत पवार यांनी सांगितले. आम्ही या संदर्भात उपमुख्यमंत्री तसेच आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेऊन याची तक्रार करणार असल्याचे प्रशांत पवार यांनी सांगितले.
(Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.