

Chandrapur News : विधानसभा निवडणुकांना वेळ असला तरी आतापासूनच रंगीत तालीम सुरू झाली आहे. विविध पक्ष आपापल्या परीने जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहाेचण्यासाठी अभियान राबवू लागले आहेत. अशातच नव्याने महाराष्ट्रात दाखल झालेल्या बीआरएस पक्षाने सीमावर्ती भागात जनतेचे प्रश्न घेत आंदोलनाची मालिकाच सुरूच ठेवली आहे. विविध अभिनव आंदोलन करून ते लोकांचं लक्ष वेधून घेत आहेत. यामुळे आता राजुरा येथील आमदारासंह अन्य प्रमुख नेत्यांचं टेन्शन वाढलं आहे.
राजुरा विधानसभा क्षेत्र हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे, पण वामनराव चटप यांनी काँग्रेसच्या या गडाला सुरुंग लावला. चटपांनी तीन वेळा राजुरा विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व केले. सध्या सुभाष धोटे हे दुसऱ्यांदा या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करत आहेत. 2014च्या निवडणुकीत मोदी लाटेत संजय धोटे यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला, अन् सुभाष धोटेंचा अगदी कमी फरकाने पराभव करत निवडून आले.
संजय धोटे यांच्या रूपानं पहिल्यांदाच राजुरा विधानसभा क्षेत्रात कमळ फुललं. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसचे सुभाष धोटे, शेतकरी संघटनेचे वामनराव चटप व भाजपचे संजय धोटे यांच्यात लढत झाली होती. यात सुभाष धोटे यांनी बाजी मारली. गोंडवाना पक्षाला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला होता. गोंडवाना गणतंत्र पक्षाचे उमेदवार गोदरू पाटील जुमनाके यांनी चाळीस हजारांहून अधिक मतं घेत ताकद दाखविली होती.
विधानसभा निवडणुकांना फार वेळ उरला नाही. अशात पुन्हा एकदा वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे. प्रकाश देतवाळे यांना काँग्रेसने जिल्हाध्यक्षपदावरून काढल्यानंतर आमदार सुभाष धोटे यांना ती जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे आमदार सुभाष धोटेंच तिकीट पक्कं मानलं जात आहे. भाजपमध्ये मात्र संजय धेाटे, देवराव भोगळे, सुदर्शन निमकर अन् आता अमर बोडलावार अशी उमेदवारांची नावे समोर येत आहेत.
गोंडपिपरीचे भाजपचे नेते असलेले बोडलावार हे जिल्हा परिषदेचे सदस्य राहिले होते. बोडलावारांच्या कार्यकर्त्यांनी राजुरा विधानसभेचा भाजप आमदाराचा उमेदवार कोण असेल, याकरिता ओपिनियन पोल घेणे सुरू केले आहे. अशात आता तेलंगणातील बीआरएस पक्षही मागे राहिला नाही. वंचितचे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांनी बीआरएस पक्षात प्रवेश घेतला.
राजुरा विधानसभेच्या रणसंग्रामात फुसेही उतरले आहेत. जिवती कोरपणा व गोंडपिपरी तालुक्यात बीआरएस पक्षााच्या माध्यमातून त्यांनी आंदोलनाचा धडाका लावला आहे. एसटी बस स्थानक नसल्याने बस स्थानकाला मुख्यमंत्र्यांचे नाव देत केलेले आंदोलन बरंच गाजलं होतं. बीआरएस(BRS)ने 12 सप्टेंबरला जिवती येथे 'देता की जाता' हा नारा देत जनआक्रोश मोर्चा काढला होता.
मागील निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या(Vanchit Bahujan Aaghadi) मदतीने गोंडवाना गणतंत्र पक्षाचे उमेदवार गोदरू पाटील जुमनाके यांनी तब्बल चाळीस हजार मते मिळवित सर्वांचेच लक्ष वेधले होते. दरम्यानच्या काळात त्यांचं निधन झालं. यामुळे आदिवासी व अनुसूचित जातीच्या मतांवर अनेक पक्षांचा डोळा आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.