Chandrapur News, 17 Apr : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात असो वा वसईतील भोंदू ऋषिकेश वैद्य असो यांनी महिलांवर केलेल्या अत्याचारांच्या घटनांमुळे महाराष्ट्र हादरला आहे. या भोंदूबाबांचे काळे कारनाम्यांमुळे राज्यात अंधश्रद्धा किती फोफावली आहे हे उघडकीस आलं.
मात्र, ही प्रकरणे समोर आली तरीही लोकांमधील अंधश्रद्धा काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. कारण खरातचं प्रकरण ताजं असतानाच आता चंद्रपूर जिल्ह्यातील एका स्मशानभूमीत अघोरी पूजा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
दोन वर्षांपासून गुप्तधनाच्या आमिषाने कुमारिका आणि विधवा महिलांचा अघोरी पूजेसाठी वापर केला जात असल्याची खळबळजनक माहिती देखील समोर आली आहे. शिवाय या प्रकरणातही महिलांचे लैंगिक शोषण झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
तर चिंचडोह बॅरेज परिसरात कासवांची तस्करी पकडल्यानंतर हा सगळा प्रकार उघडीस आला आहे. सावली वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी १२ एप्रिल रोजी कासवांची तस्करी करणाऱ्या ६ जणांना अटक केली. या आरोपींचे मोबाईल तपासले असता वनअधिकाऱ्यांना धक्काच बसला. कारण आरोपींच्या मोबाईलमध्ये वन्यजीव तस्करीसोबतच अघोरी पूजेचे किळसवाणे व्हिडिओ आणि चॅटिंग आढळले.
स्मशानभूमीत मध्यरात्री केलेल्या पूजेचे व्हिडिओ, घुबड आणि कासवांचे फोटो, तसेच अनेक तरुण मुली आणि विधवांचे फोटो या मोबाईल मध्ये आढळले. शिवाय या मुली आणि महिलांच्या जन्मकुंडल्या आणि त्यांच्या अवयवांचे फोटो देखील हाती लागले आहेत. या प्रकरणामुळे आता परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणातील आरोपींनी अघोरी पूजेतून सोन्याची बिस्किटे मिळाल्याचा बनाव रचला होता. मात्र ती बिस्किटे बनावट असल्याचंही आता उघड झालं आहे. सध्या या सहा आरोपींना वनकोठडीत ठेवलं आहे. तर या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला मांत्रिक आणि महाराज अद्याप फरार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या रॅकेटमध्ये सुमारे ५० मध्यस्थी असून ते सावज शोधायचं काम करायचे. शिवाय ‘सावज’ महिलांच्या जन्मकुंडल्या आणि त्यांचे व्हिडिओ हे मध्यस्थ मुख्य मांत्रिकाकडे पाठवायचे. या रॅकेटमध्ये मांत्रिकाला 'टेस्टर' हा कोडवर्ड वापरत. एखादी महिला किंवा प्राणी अघोरी पूजेसाठी योग्य आहे की नाही, हे हा टेस्टर ठरवायचा आणि त्यानंतर एखाद्या निर्जनस्थळी किंवा स्मशानभूमीत रात्री अघोरी विधी पार पाडला जायचा, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दरम्यान, सावली वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांनी सांगितलं की, "कासव तस्करीतील आरोपींच्या मोबाइलमध्ये अघोरी पूजेचे व्हिडिओ मिळाले. हे प्रकरण गंभीर असून या पूजेत मुली आणि विधवा महिलांचा वापर केला जात होता." त्यामुळे आता या प्रकरणाची व्याप्ती नेमकी किती आहे. यामध्ये कोणकोण सामील आहे याचा तपास घेतला जात आहे. मात्र, खरात प्रकरणानंतर हे आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.