

Chandrapur News: चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक होऊन जवळपास सहा महिने उलटले तरी, तरी काँग्रेसमध्ये गटनेतेपदावरून पेटलेला राजकीय संघर्षाची धग कायम होती. चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्यातील राजकीय वैर दिल्लीपर्यंत जाऊनही मिटले नाही, त्याचाच फटका बसून संधी असूनही काँग्रेसला चंद्रपूर महापालिकेत सत्ता गमवावी लागली, तरीही कोणीच माघार घेतली नाही. त्यातच सत्तेची संधी गमावलेल्या काँग्रेसला दुसरा मोठा धक्का बसला आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेत गेल्या काही महिन्यांपासून गटनेतेपदाचा वाद पेटला आहे. काँग्रेसमधील खासदार प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार या दोन्ही गटाकडून गटनेतेपदासाठी ताकद लावण्यात आली होती. मात्र, चंद्रपूर महापालिकेतील गटनेतेपदाचा वाद अखेर बुधवारी (ता.22) संपुष्टात आला आहे. यात वडेट्टीवार गटाला धक्का बसला असून धानोरकरांचं चंद्रपूरमधलं राजकीय वजन वाढल्याची चर्चा आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विभागीय आयुक्तांनी चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदाबाबतची सुनावणीही पूर्ण केली आहे. यात अखेर आयुक्तांनी राजेश अडूर यांची नियुक्ती रद्द केली आहे. तर दुसरीकडे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी 16 नगरसेवकांनी आक्षेप घेत गटनेते राजेश अडूर यांच्या निवडीलाच आव्हान दिलं होतं.
यानंतर आता सुरेंद्र अडबाले यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या गटनेतेपदी अधिकृत नोंद केली आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी 16 नगरसेवकांना एकत्रित करत गटनेते राजेश अडूर यांना बाजूला करण्याचा प्रस्ताव दाखल केला होता.
नागपूर विभागाच्या विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आता काँग्रेसमधील गटनेतेपदाचा वादावर अंतिम निर्णय जाहीर केला आहे. त्यांनी दोन्ही बाजूंचं म्हणणं मांडल्यानंतर आता राजेश अडूर यांची गटनेतेपदाची नोंद अधिकृतपणे रद्द केली आणि सुरेंद्र अडबाले यांच्या गटनेतेपदावर अंतिम शिक्कामोर्तब केलं आहे.
काँग्रेसचे महापालिकेत 27 नगरसेवक असून त्यात धानोरकर यांनी स्वतःचे 11 आणि वडेट्टीवार गटातील 5 नगरसेवक फोडून वडेट्टीवार समर्थक राजेश अडूर यांना गटनेतेपदावरून हटवण्यासाठी बहुमत गोळा केले होते. ही कुणकुण लागताच विजय वडेट्टीवार गटाकडूनही शनिवारी (ता.13 जून) गटनेते राजेश अडूर यांनी सर्व नगरसेवकांची बैठक बोलावत सर्व नगरसेवकांना व्हीपही बजावला होता.
खासदार प्रतिभा धानोरकर समर्थक 16 नगरसेवकांनी या बैठकीला दांडी मारली होती. याचवेळी धानोरकर समर्थक 16 नगरसेवकांनी अडूर यांना गटनेतेपदावरून हटवून सुरेंद्र अडबाले यांची निवड करण्याबाबतचा ठराव मंजूर केला होता. यानंतर काँग्रेसच्या नगरसेविका संगीता भोयर यांच्यासह 15 सदस्यांनी 16 जूनला विभागीय आयुक्तांकडे शपथपत्र व ठराव सादर केला होता. त्यात गटनेते बदलाची नोंद घेण्याची मागणी करण्यात आली होती.
यानंतर विभागीय आयुक्तांनी विद्यमान गटनेते राजेश अडूर यांची नोंदणी रद्द केली असून, त्यांच्या जागी खासदार प्रतिभा धानोरकर समर्थक सुरेंद्र अडबाले यांची काँग्रेस गटनेते म्हणून अधिकृत नोंद घेण्यात आली आहे. त्यामुळे वडेट्टीवार यांना मोठा धक्का बसला असून चंद्रपूर महापालिकेतील त्यांचे वर्चस्व जवळपास संपुष्टात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.