
Gadchiroli, 06 June : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आजचा गडचिरोली दौरा उल्लेखनीय ठरला. सुमारे दोन डझन कुख्यात नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली. आजवर कोणी गेले नाही, अशा अतिशय दुर्गम कवंडे या गावात फडणवीस गेले. तेथील नागरिकांसोबत त्यांनी संवाद साधला. आदिवासी समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्याला उपस्थिती लावली आणि नक्षलवाद्यांसोबत जीव मुठीत घेऊन लढा देणाऱ्या जवानांचा त्यांनी सत्कारही केला. या अतिशय व्यस्त दौऱ्यात आणखी एक उल्लेखनीय घटना घडली. काँग्रेसने त्यांच्या भेटीसाठी आजच महायज्ञ आयोजित केला होता आणि योगायोगाने ते गडचिरोतील दाखल झाले. त्यामुळे ते काँग्रेसच्या महायज्ञाला पावले, असे मानले जात आहे.
मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज गडचिरोली जिल्ह्यात येऊन नागरिकांच्या समस्या ऐकाव्यात आणि त्यांचे निराकरण करावे; म्हणून गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सेमाना देवस्थान येथे महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते.
या महायज्ञाला खासदार डॉ. नामदेव किरसान, गडचिरोली जिल्हा काँग्रेस (Gadchiroli Congress) कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, आमदार रामदास मसराम, प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा निरीक्षक ॲड. सचिन नाईक, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. विश्वजीत कोवासे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, महिला अध्यक्ष कविता मोहरकर, शहराध्यक्ष सतीश विधाते, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जीवन नाट, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, मिलिंद खोब्रागडे, प्रमोद भगत, प्रशांत कोराम तसेच शेतकरी, महिला, युवक व काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारूनही मुख्यमंत्री गडचिरोली जिल्ह्यात येत नाहीत, त्यामुळे त्यांनी नागरिकांना दर्शन देऊन येथील समस्यांचे निराकरण करावे, यासाठी मुख्यमंत्र्यांनाच साकडे घालत सेमाना देवस्था येथे हा महायज्ञ आयोजित करण्यात आला होता. दरम्यान नेमक्या त्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यात येत विविध कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवली. ते शुक्रवारी येणार अशी चर्चा असली, तरी त्यांचा दौरा गुप्त ठेवण्यात आला होता. मात्र मुख्यमंत्र्यांचे आमगन हा आपल्या महायज्ञ आंदोलनाचा विजय असल्याचे काॅंग्रेस मानत आहे.
गडचिरोली नक्षलग्रस्त असल्याने मुख्यमंत्र्यांच्या दौरा कालपर्यंत गुप्त ठेवण्यात आला होता. त्यांनी आपल्या दौऱ्यात गडचिरोली जिल्ह्यातील शेवटचे व दुर्गम असलेल्या कवंडे गावाला भेट दिली. गडचिरोली आणि छत्तीसगडच्या सीमेवर पुलाची ड्रोनने पाहाणी केली. बारा कुख्यात नक्षलवाद्यांनी त्यांच्या समक्ष शस्त्र खाली ठेवले. यावेळी त्यांनी जवानांचा सत्कार करून गावकऱ्यांसोबत संवादही साधला.
गडचिरोलीला महाराष्ट्राचे शेवटचे नव्हे; तर पहिले गाव करण्याचा संकल्प असल्याचे सांगून त्यांनी या आदिवासी जिल्ह्यात होत असलेल्या औद्योगिक क्रांतीची माहितीही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.