Yavatmal DCC Bank : जिल्हा बँकेचा ‘बिनविरोध’ प्लॅन अडचणीत : काँग्रेसच्या 4 जागांच्या मागणीने जागावाटपाचा फॉर्म्युला बिघडला!

Vidharbh Political News : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक अंतिम टप्प्यात असताना बिनविरोध निवडीच्या चर्चेला काँग्रेसच्या भूमिकेमुळे ट्विस्ट आला आहे. जागावाटपावरून मतभेद झाल्याने बिनविरोध निवडीचा प्लॅन अडचणीत आला.
Yavatmal DCC Bank
Yavatmal DCC Bank Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Yavatmal, 29 September : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक अंतिम टप्प्यात आली असतानाच बिनविरोधच्या चर्चेत ट्विस्ट आला आहे. जिल्हा बॅंकेच्या सहकारी सोसायटी गटातील जागा वाटप अंतिम मानले जात असतानाच काँग्रेसच्या भूमिकेमुळे पुन्हा एकदा माशी शिंकली आहे, त्यामुळे यवतमाळ जिल्हा बॅंकेचा बिनविरोध निवडीचा प्लॅन अडचणीत आला आहे.

सहकारी सोसायटी मतदारसंघातील जागावाटपानुसार शिवसेना 3, भाजप 2, राष्ट्रवादी काँग्रेस 1, काँग्रेस 3 असा फॉर्म्युला निश्चित होत आला होता. मात्र, काँग्रेसने तीनऐवजी चार जागांच्या मागणीवर ताठर भूमिका घेतली, त्यामुळे यवतमाळ जिल्हा बँकेच्या बिनविरोध निवडीला ब्रेक लागला आहे. आता माघारीसाठी आणखी एक दिवस आहे, त्यात काय कमाल होते, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

यवतमाळ जिल्हा बँकेच्या सत्तेची गणिते जुळविण्यासाठी नेत्यांच्या बैठकांवर बैठका सुरू असतानाच जिल्हा गटातील जागा बिनविरोध करण्याचा पहिलाच प्रयत्न जागा वाटपाच्या तिढ्यात अडकला आहे. शिवसेना तीन, भाजप दोन, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार एक आणि काँग्रेस तीन, असा प्राथमिक फॉर्म्युला ठरला होता. काँग्रेसने चार जागा मागितल्याने पहिल्याच फेरीतील बोलणी निष्फळ ठरली.

सुरवातीच्या चर्चेत काँग्रेसला दोन जागा देण्याचा प्रस्ताव होता. त्यात एक जागा वाढवून तीन करण्याची तयारी दर्शविण्यात आली. मात्र, काँग्रेसने चार जिल्हा गटातील जागांसह एक नामनिर्देशित जागा मागितल्याने जागावाटपाचे गणित पुन्हा बिघडले आहे. त्यामुळे बिनविरोधाचा मार्ग मोकळा होण्याऐवजी राजकीय तणाव वाढण्याची चिन्हे आहेत.

Yavatmal DCC Bank
Satara Dcc Bank Election : हायकमांडचे फर्मान येताच सातारा DCC साठी भाजपचा राष्ट्रवादी-शिवसेनेसोबत युतीचा निर्णय; गोरे, देसाईंच्या गैरहजेरीची चर्चा...

यवताळ जिल्हा बँकेच्या २५ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. आता अर्ज माघारीच्या अंतिम टप्प्यात सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ता. ३० सप्टेंबर ही अर्ज माघारीची अंतिम तारीख असल्याने हातात केवळ एकच दिवस शिल्लक आहे, त्यामुळे प्रत्येक जागेचे राजकीय गणित जुळविण्यासाठी नेत्यांच्या गाठीभेटींना वेग आला आहे.

काँग्रेसच्या मागणीवर सोमवारी (ता. २८ सप्टेंबर) रात्री पुन्हा सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत तडजोडीचा फॉर्म्युला निघतो की जागावाटपाचा तिढा कायम राहतो, याकडे उमेदवारांसह सहकार क्षेत्राचे लक्ष लागले होते. एकीकडे बिनविरोधासाठी प्रयत्न आणि दुसरीकडे प्रत्येक पक्षाची जागांवरील दावेदारी, यामुळे जिल्हा गटातील राजकीय वातावरण तापले आहे.

अर्ज छाननीत बाद होताच काँग्रेस नेते आक्रमक

राळेगाव तालुका गटातील प्रफुल्ल मानकर आणि पांढरकवडा तालुका गटातील श्रीनिवास नालमवार यांचे नामनिर्देशन अर्ज छाननीत बाद झाले आहेत. दोघांनीही या निर्णयाविरोधात विभागीय सहनिबंधकांकडे अपील केले आहे. त्यानंतर न्यायालयीन मार्गाचाही अवलंब केल्याची माहिती आहे. दोन्ही प्रकरणांच्या निकालाकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे. राळेगाव आणि पांढरकवडा हे काँग्रेसच्या राजकीय गणिताच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते. यामुळे या प्रकरणातील निर्णयाला विशेष महत्त्व आहे.

Yavatmal DCC Bank
ZP Controversy : भाजपच्या जिल्हा परिषद अध्यक्षांची खुर्ची धोक्यात : पीए लाचखोरीत सापडताच मित्र पक्ष राजीनाम्यासाठी आक्रमक

अखेरच्या दिवशी चित्र बदलण्याची शक्यता

तालुका गटातील काही जागाही बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुसद, दिग्रससह आणखी दोन तालुका गटांमध्ये तडजोडीच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे जिल्हा गटातील फॉर्म्युला आणि तालुका गटातील संभाव्य बिनविरोध यामुळे अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे चित्र बदलण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com