

Bhandara Woman Death Case : कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेदरम्यान झालेल्या कथित वैद्यकीय निष्काळजीपणामुळे एका 23 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात तब्बल दीड वर्षांनंतर मोठी कारवाई करण्यात आली आहे.
भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर पोलिसांनी शस्त्रक्रिया आणि उपचाराशी संबंधित सहा डॉक्टरांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, या कारवाईमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
डॉ. श्रीकांत गिरीपुंजे, डॉ. पी. के. जांभूळकर, डॉ. अपूर्वा सिंघ, डॉ. पंकज लडके (सरांडी बुद्रुक), डॉ. खुशाल भोयर आणि लाखांदूर ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ. रोशनी राऊत यांच्याविरोधात हा गुन्हा (Crime) नोंदविण्यात आला आहे.
मृत महिलेचे (Woman) नाव मेघा बनारसे (वय 23) असे असून त्या लाखांदूर तालुक्यातील विरली बुद्रुक येथील रहिवासी होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर संतप्त ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी रास्ता रोको आंदोलन करत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, 16 नोव्हेंबर 2024 रोजी सरांडी बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मेघा बनारसे यांच्यावर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र शस्त्रक्रियेनंतर काही दिवसांतच त्यांना तीव्र पोटदुखी आणि इतर त्रास जाणवू लागला.
प्रकृती बिघडत गेल्याने त्यांना प्रथम भंडारा येथील साई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर 29 डिसेंबर रोजी पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथील आस्था रुग्णालयात हलविण्यात आले. तेथेही प्रकृतीत सुधारणा न झाल्याने 18 जानेवारी 2025 रोजी त्यांना नागपूरला हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणाची चौकशी नागपूर विभागीय आरोग्य समितीकडून करण्यात आली होती. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर लाखांदूर पोलिसांनी संबंधित सहा डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अहवालात शस्त्रक्रिया आणि उपचार प्रक्रियेत गंभीर त्रुटी व निष्काळजीपणाचे मुद्दे नमूद करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, या प्रकरणातील पुढील तपास लाखांदूर पोलीस करत असून, चौकशीतून आणखी महत्त्वाचे तपशील समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.