Nagpur, 02 November : काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव तसेच माजी मंत्री अनिस अहमद यांनी अवघ्या पाच दिवसांतच वंचित बहूजन आघाडीतून पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे. मुंबई येथे आज त्यांनी अधिकृतपणे काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश पार पडला. त्यांना विधान परिषदेचे लॉलीपॉप देण्यात आल्याची चर्चा आहे. अहमद यांच्या धक्कातंत्रामुळे विधानसभेच्या निवडणुकीत भाजपची अडचण होण्याची शक्यता आहे.
अनिस अहमद (Anis Ahmed ) मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात ते पशुसंवर्धन तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री होते. ते पराभूत झाल्यानंतर मुस्लिम समाजाच्या एकाही नेत्याला काँग्रेसने प्रतिनिधित्व दिलेले नाही. यावेळी मध्य नागपूर मुस्लिम समाजाला द्यावा, अशी जोरदार मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांमार्फत केली जात होती. मात्र, काँग्रेसने बंटी शेळके यांना उमेदवारी जाहीर केली.
मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातून (Central Nagpur Assembly Constituency) बंटी शेळके यांना उमेदवारी दिल्याने अनिस अहमद नाराज होते. त्यांनी २८ ऑक्टोबरला मुंबई येथे प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता. त्यांना लगेच मध्य नागपूर विधानसभेचे उमेदवार घोषित करून एबी फॉर्म देण्यात आला होता.
उमेदवारी अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी अहमद हे वाजतगाजत उमेदवारी अर्ज दाखल करायला गेले होते. तोपर्यंत तीन वाजले होते. त्यामुळे त्यांना उमेदवारी अर्ज भरता आला नाही. मात्र, अर्ज दाखल करायला अहमद यांनी मुद्दामच उशिर केल्याची चर्चा होती. काँग्रेसमध्ये प्रवेश करून अनिस अहमद यांनी स्वतःच अर्ज दाखल करायची वेळ चुकवली असल्याचे स्पष्ट होते.
अहमद यांनी उमेदवारी अर्ज भरू नये; म्हणून काँग्रेसच्या नेत्यांनी फोनाफोनी केली होती. त्यांना विधान परिषदेचे गाजरही त्यांना दाखवण्यात आले असल्याचे समजते. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी त्यांच्यासोबत चर्चा केली असल्याचे समजते. अनिस अहमद यांचे भाजपच्या एका बड्या नेत्यांसोबत जवळचे संबंध आहेत. त्यांचाही सल्ला उमेदवारी अर्ज घेण्यापूर्वी त्यांनी घेतला असावा, अशी नागपूरच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
अनिस अहमद यांच्या धक्कातंत्रामुळे मात्र मध्य नागपूरमधील भाजप उमेदवाराला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुस्लिम आणि हलबा समाजाची मते ज्याच्याकडे वळतील, तो उमेदवार येथून निवडून येण्याची अधिक शक्यता आहे.
Edited By : Vijay Dudhale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.